भारतीय संस्कृती 4
असे दृश्य पाहून विरघळतो. नको रे कापू, नको रे कापू. असे जणू हे गवत सांगत आहे, असे त्याला वाटते. त्याच्या हातातील विळा गळून पडतो. अद्वैताचा अनुभव घेणा-या ऋषींच्या आश्रमात वाघ व शेळी प्रेमाने नांदतात, हरिणे सिंहाची आयाळ खाजवतात, साप मुंगसाला मिठी मारतो. अद्वैत म्हणजे उत्तरोत्तर वाढते प्रेम. विश्वाला विश्वसाने आलिंगिणारे प्रेम.
परंतु अद्वैताला जन्म देणा-या व अद्वैत जीवनात अनुभव पाहणा-या थोर संतांच्या या भरतभूमीत आज अद्वैताचा संपूर्ण अस्त झाला आहे. आम्हांला ना शेजारी ना पाजारी! आम्हांला आजूबाजूचे विराट दु:ख दिसत नाही. आमचे कान बधिर झाले आहेत, डोळे अंधळे झाले आहेत. सर्वांना हार्ट-डिझीज झालेला आहे!
वेदांतील एक महर्षी हृदय पिळवटून सांगत आहे:
“मोघमन्नं विन्दते अप्रचेता:
सत्यं ब्रवीमि वध इत् स तस्य
न अर्यमाणं पुष्यति नो सखायं
केवलाघो भवति केवलादि”
“संकुचित दृष्टीच्या मनुष्याला मिळालेल्या धान्याच्या राशी फुकट आहेत. त्याच्या घरात साठवलेले ते धान्य नसून ते त्याचे मरण साठवलेले आहे! जो भावाबहिणींस देत नाही, योग्य माणसांस देत नाही, असा केवळ स्वत:पुरते पाहणारा मनुष्य केवळ पापरूप होय.”
आजूबाजूला लाखो कष्ट लोक अन्नवस्त्रहीन असता आपल्या बंगल्यात कपड्यांचे ढीग व धान्याची कोठारे ठेवणे हे धोक्याचे आहे. ऋषी म्हणतो, “तुमचा चक्काचूर करणारे ते बाँबगोळे आहेत.” ऋषींचे हे म्हणणे इतर देशांत अनुभवास येत आहे. आपल्याही देशात येईल.
नामदेवांनी उपाशी कुत्र्याला तूप-पोळी खाऊ घातली. त्याच संतांच्या भूमीत उपाशी माणसांची कोणी कदर करीत नाही. कोणी अद्वैतांचा अभिमानी शंकराचार्य संस्थानिकास सांगत नाही की कर कमी कर; सावकारास सांगत नाही की व्याज कमी कर; कारखानदारास सांगत नाही की मजुरी वाढव व कामाचा थोडा वेळ कमी कर. सर्वांच्या पुड्या खाऊन व पाद्य-पूजा घेऊन संचार करणारे ‘श्री’ जीवनात अद्वैत यावे म्हणून मरत आहेत का?
आजच्या या साम्यवादाला हे संस्कृतीच्या गप्पा मारणारे हसतात. परंतु साम्यवाद म्हणजे एक प्रकारे कृतीत आणलेला वेदान्त होय. हजारो वर्षे वेदान्त घोकला जात आहे. कथा-पुराणांतून सांगितला जात आहे. वेदान्त शिकविणा-या समाजाला समाजात द्वैताचा नुसता बुजबुजाट उडाला आहे. या बुजबुजाटात सुखशांती आणण्याचे काम साम्यवादी करीत आहेत.