भारतीय संस्कृती 175
मरणाची फारच आवश्यकता असते. कधी कधी जगातून या सद्य:कालीन नामरूपाने नाहीसे होणे हे इष्ट व आवश्यक असते. एखादा मनुष्य, समजा, वाईट रीतीने वागत होता. या माणसास पश्चात्ताप होऊन पुढे तो जरी चांगल्या रीतीने वागू लागला, तरी जनतेला त्याच्या काळ्या भूतकाळाचे विस्मरण होत नाही. लोक म्हणतात, 'तो अमुक मनुष्य ना ? माहीत आहे त्याचे सारे; 'करून करून भागले आणि देवपूजेला लागले !' उगीच सोंग करतो झाले. पुन्हा ये रे माझ्या मागल्या त्याचे सुरू होईल. कसला, पश्चात्ताप नि काय !' लोकांचे हे उद्गार स्वत:ची सुधारणा करू पाहणा-या त्या अनुतप्त जीवाच्या मर्मी लागतात. स्वत:चा भूतकाळ तो विसरू पाहतो. परंतु जग तो विसरू इच्छीत नाही. अशा वेळेस पडद्याआड जाऊन नवीन रंग व नवीन नामरूप घेऊन लोकांसमोर पुन्हा येण्यातच मौज असते.
मरण नसते तर जग भेसूर दिसले असते. मरणामुळे संसाराला रमणीयता आहे. मरणामुळे जगात प्रेम आहे. आपण सारे जण अमर असतो, तर एकमेकांस विचारले नसते. सारे दगडासारखे दूर दूर पडून राहिलो असतो. उद्या आपल्याला जावे लागले तर का वाईट वागा, असे मनुष्य मनात म्हणतो व गोड वागतो. इंग्रजी भाषेत एक कविता आहे : दु:खी भाऊ म्हणतो, कोठे आहे माझा भाऊ ? मी का आता एकट्याने खेळू ? एकटा नदीकाठी हिंडू ? फुलपाखरांपाठीमागे धावू ? कोठे आहे माझा भाऊ ? तो जिवंत असतानाच त्याच्यावर प्रेम केले असते, तर किती सुरेख झाले असते ! परंतु आता काय ?
मरण उपकारक आहे. जीवनाने जे काम होत नाही, ते कधी कधी मरणाने होते. संभाजीमहाराजांच्या जीवनाने मराठ्यांत फूट पडली, परंतु त्यांच्या महान मरणाने मराठे जोडले गेले. ते मरण म्हणजेच अमृत ठरले. ख्रिस्ताच्या जीवनाने जे झाले नाही, ते त्याच्या क्रॉसवरच्या मरणाने झाले. मरणात अनंत जीवन असते.
आपल्याला वाटते, की मरण म्हणजे अंधार, परंतु मरण म्हणजे अमर प्रकाश, अनंत प्रकाश.-मरण म्हणजे निर्वाण, म्हणजेच अनंत जीवन पेटविणे. भगवान बुध्द म्हणत, 'स्वत:चे निर्वाण करा म्हणजेच जगावर खरे प्रेम करता येईल. स्वत:ला विसरा. स्वत:च्या वैयक्तिक आशा, आकांक्षा, क्षुद्र स्वार्थ-लोभ विसरा. म्हणजेच खरे अमर जीवन प्राप्त होईल.' स्वत:ची सर्व आसक्ती विसरणे, स्वत:च्या देहाच्या, मनाच्या, इंद्रियांच्या स्वार्थी वासना विसरणे म्हणजेच मरणे. हे मरण या देहात असूनही अनुभवता येते. नारळातील गोटा नारळापासून अलग होऊन जसा खुडखुड वाजतो, त्याप्रमाणे देहेन्द्रियांपासून आत्म्याला अलग करून वागणे म्हणजे मरण. तुकाराममहाराज म्हणूनच म्हणत असत :
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां
तो सुखसोहळा अनुपम
हे मरण ज्याने एकदा अनुभविले, त्याला पुनश्च मरण नाही. जिवंतपणी जो मरावयास शिकला, तो चिरंजीव झाला.
जर्मन दंतकथांमध्ये एक फार भीषण गोष्ट आहे : एक राक्षस आहे. 'तू कधी मरणार नाहीस' असा शाप त्या दैत्याला देवाने दिलेला असतो. आपल्या देशातील राक्षसांनी हा वर मानला असता. कधीही मरण न येणे याच्याहून भाग्याची गोष्ट कोणती, असे त्यांनी म्हटले असते. परंतु तो जर्मन देशातील राक्षस अस्वस्थ होतो. त्याला जीवनाचा कंटाळा येतो. स्वत:च्या त्याच त्या जीवनाचा विसर पडावा असे त्याला वाटते. स्वत:च्या देहाचा विसर पडावा असे त्याला वाटते देहाचा चिकटलेला हा मातीचा गोळा पडावा असे त्याच्या आत्म्याला वाटते. ही देहाची खोळ, हे देहाचे ओझे कधी गळून पडेल असे त्याला होते; परंतु त्याला मरण येत नाही. तो उंच कड्यावरून स्वत:ला खाली लोटतो; परंतु चेंडूसारखा तो वर उसळतो. अग्नी त्याला जाळीत नाही, पाणी बुडवीत नाही. विष मारीत नाही. फासाचा हार होतो, विषाचे अमृत होते. देवाच्या नावाने तो दातओठ खातो. कडाकडा बोटे मोडतो. त्याच्या हृदयाची होळी पेटते. परंतु ही होळी शांत करणारे मरणाचे मेघ ओथंबून येत नाहीत. त्या अनुकंपनीय राक्षसाची केविलवाणी दीन दशा सरत नाही, मरणाचे सौभाग्य त्याला मिळत नाही.
किती असह्य आहे ही दशा ! हे मरण निर्माण करणा-या परमेश्वराचे कितीही आभार मानले, तरी ते पुरेसे होणार नाहीत. मरण म्हणजे जिवा-शिवांचे हितगूज. मरण म्हणजे जीवनातील चिखल खाली बसणे. मरण म्हणजे पुनर्जन्म.