भारतीय संस्कृती 31
कर्म
भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात याचा अर्थ काय? व्यक्तीचा संसार मिथ्या आहे. मी केवळ माझ्यापुरते पाहणे म्हणजे मिथ्या आहे. माझ्या आजूबाजूला दु:ख असताना मी एकटा सुखी होऊ पाहणे म्हणजे भ्रम आहे. आजूबाजूला आग लागली असता माझे एकट्याचे घर सुरक्षित कसे राहील? जगात केवळ स्वत:साठी पाहता येणार नाही. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जर केवळ स्वत:पुरते पाहील तर कुटुंबाचा नाश होईल. त्या कुटुंबात आनंद कसा दिसेल? समाधान कसे नांदेल? ज्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती इतरांच्या सुखात स्वत:चे सुख मानते, तेच कुटुंब भरभराटेल, सुखी व आनंदी दिसेल.
जो नियम कुटुंबाला लागू तोच समाजाला, सर्व संसाराला. आपण समाजासाठी आहोत, या मानवजातीसाठी आहोत, या सर्व प्राणिमात्रांसाठी आहोत. दगड अलग पडला तरी त्याला महत्त्व नाही, परंतु तो इमारतीत संयमपूर्वक बसेल, तर त्याला अमरता येते, त्याल महत्त्व येते. आपण या समाजाच्या सुंदर इमारतीत योग्य ठिकाणी बसलो पाहिजे व तेथे शोभले पाहिजे.
समाजाला सत्यता आहे, व्यक्तीला नाही. परंतु याचा अर्थ व्यक्तीला स्वातंत्र्य नाही असा नाही. समाजासाठी व्यक्ती आहे; परंतु व्यक्ती आपल्या गुणधर्माप्रमाणे समाजासाठी जगेल. माझ्या ठायी जो वर्ण आहे, त्या वर्णाच्या विकासाने मी समाजाची सेवा करीन. मी समाजाची सेवा करीन हे खरे, परंतु माझ्या विशिष्ट आवडीप्रमाणे मी सेवा करीन. माझा वर्ण समाज मारणार नाही. माझ्या वर्णाच्या विकासासाठी समाज सोयी करून देईल. परंतु माझ्या विकासाने मी समाजाचीच पूजा करीन. माझा विकास हा समाजाला शोभवील, सुखवील, हसवील, पोषवील. मी समाजासाठी व समाज माझ्यासाठी. समाजाला माझ्यामुळे शोभा व समाजामुळे मला शोभा. असा हा अन्योन्य-संबंध आहे.
मनुष्याने समाजाची सेवा करावयाची, परंतु कोणती सेवा त्याने करावयाची? त्याची निवड कोणी करावयाची? हे कोणी ठरवावयाचे?
कर्माशिवाय मनुष्य जगूच शकत नाही. आपण जर सारे कर्मशून्य होऊ, तर समाज चालेल कसा? सारी सृष्टी कर्म करून राहिली आहे. प्रत्येकाने कर्म केलेच पाहिजे. प्रत्येकाला शरीर, हृदय व बुद्धी आहे. शरीराने कर्म करावयाचे, त्या कर्मात हृदयाचा जिव्हाळा ओतावयाचा; व ते कर्म करताना बुद्धी वापरावयाची. अशा रीतीने प्रत्येक व्यक्तीने शरीर, हृदय व बुद्धी या तिहींच्या योगाने समाजासाठी रात्रंदिवस झिजावयाचे, आनंदाने श्रमावयाचे.
परंतु कोणत्या कर्मात रमावयाचे? आपल्या आवडीच्या कर्मात. आपला जो वर्ण असेल, आपली जी वृत्ती असेल, त्याला अनुरूप अशा कर्मात रमावयाचे. त्याच कर्मात आपण अखंड रमू, -जे कर्म आपणावर लादले नसून आपल्या आवडीचे असेल.
जे कर्म माझ्या इच्छेविरुद्ध मला करावे लागेल, त्याने माझा आत्मा शिणेल. त्यात मला आनंद वाटणार नाही. ते कर्म योग्य रीतीने माझ्याकडून होणार नाही. रडतराउतांना घोड्यावर बसविण्यात काय अर्थ?