भारतीय संस्कृती 134
बलोपासना
भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञानप्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची नितान्त आवश्यकता आहे. बलवान शरीर, निर्मळ व सतेज बुध्दी, प्रेमळ परंतु प्रसंगी वज्राप्रमाणे कठोर होणारे हृदय, या सर्वाची जीवनाच्या विकासास जरुरी आहे. जीवनाला समतोलपणा तरच येईल.
शरीरच नसेल तर हृदय-बुध्दी राहणार तरी कोठे ? या शरीराच्या द्वाराच सर्व पुरुषार्थ प्राप्त करून घ्यावयाचा आहे. निराकार आत्म्याला साकार होऊनच सर्व काही करता येते. बाहेरची काच नसेल, तर आतील ज्योतीची प्रभा तितकी स्वच्छ पडणार नाही. बाहेरची काच स्वच्छ सुंदर, स्वच्छ असेल तरच दिव्याचा प्रकाश चांगला पडेल. आपल्या शरीरातून आत्मसूर्याचा प्रकाश बाहेर पडावयाचा आहे. हे शरीर जितके निरोगी, सुंदर, स्वच्छ व पवित्र राखू तितके आत्म्याचे प्रकाशन सुरेख रीतीने होईल.
उपनिषदांतून बळाचा महिमा गायिलेला आहे. दुर्बळाला काही करता येत नाही. एक बळवान मनुष्य येतो व शेकडो लोकांना तो नमवितो. बळ नसेल तर हिंडता-फिरता येणार नाही. हिंडता-फिरता आले नाही तर ज्ञान मिळणार नाही, अनुभव मिळणार नाही. थोरांच्या गाठीभेटी होणार नाहीत, गुरुसेवा होणार नाही. बळ नसेल तर काही नाही. म्हणून बळाची उपासना करा असे ऋषी सांगतात.
"नायमात्मा बलहीनेन लभ्य:' असे श्रुतिवचन आहे. दुर्बळाला दास्य व दु:ख ही सदैव ठेवलेली. अंगात ताकदच नाही तर काहीएक नाही. इमारतीचा पाया खोल, मजबूत लागतो. चांगले भक्कम दगड तेथे रचावे लागतात. खडकावर उभारलेली इमारत पडणार नाही. वाळूत रचलेली इमारत केव्हा कोसळेल वा खचेल त्याचा नेम नाही. शरीर सर्व गोष्टींचा पाया आहे.
"शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् !' सर्व धर्मांचे मुख्य साधन म्हणजे हे शरीर. या शरीराची उपेक्षा करणे मूर्खपणाआहे. ते पाप आहे. तो देवाचा व समाजाचा घोर अपराध आहे. शरीर बळवान असल्याशिवाय आपणांस कोणतेही ऋण फेडता येणार नाही. समाजसेवा करून देवऋण फेडता येणार नाही. सुंदर संपत्ती निर्माण करून पितृऋण फेडता येणार नाही. ज्ञानार्जन करून ऋषिऋण फेडता येणार नाही. ही तीन ऋणे आपल्या माथ्यावर असतात. ही तीन ऋणे बरोबर घेऊन आपण जन्मत असतो. त्यांची फेड करावयासाठी शरीर धडधाकट ठेविले पाहिजे.
ब्रह्मचर्य हा बळाचा पाया आहे. त्या ब्रह्मचर्याची महती स्वतंत्र प्रकरणात सांगितली आहे. मिळविलेले बळ राखणे म्हणजे ब्रह्मचर्य. बळ मिळवा व ते नीट राखा.
बळ मिळविण्यासाठी शरीराला व्यायाम हवा. केवळ पोषाखी बनून भागणार नाही. भारतीय संस्कृतीत नमस्कारांचा व्यायाम घालून देण्यात आला आहे. सूर्याला नमस्कार घालावयाचे, स्वच्छ हवेत तेजस्वी सूर्याला साक्ष ठेवून नमस्काराचा व्यायाम घ्यावयाचा, प्राणायामाचा व्यायामही नित्य सांगितला आहे. संध्या करताना अनेकदा प्राणायम करावा लागतो. नमस्कार व प्राणायाम यांचा व्यायाम मरेपावेतो घ्यावा.
निरनिराळ्या मल्लविद्या भारतात होत्या. मल्लविद्येसाठी भारतवर्ष प्रसिध्द आहे. प्रत्येकजण मल्लविद्या शिके. व्यायामाचे अनेक प्रकार होते. काही व्यायाम शरीर सुदृढ व सुंदर व्हावे म्हणून असत, तर काही व्यायाम स्वसंरक्षणाची साधने म्हणून असत. लाठी, दांडपट्टा, भाला, तलवार वगैरे स्वसंरक्षणाची साधने म्हणून शिकविण्यात येत.