भारतीय संस्कृती 168
-आणि कृष्ण केव्हा जन्मतो ? राम भर दुपारी जन्मला, तर कृष्ण भर मध्यरात्री जन्मला. श्रावणातील मुसळधार पाऊस, मेघांचा गडगडाट, विजांचा चमचमाट, यमुना तुडुंब भरलेली; अशा वेळी कृष्ण जन्म घेतो. ज्या वेळेस जीवनात कृष्णपक्षातील अंधार असतो, भयंकर निराशा असते, डोळ्यांतून अश्रूंचा पूर चाललेला असतो, मार्ग दिसत नाही, हृदयाची यमुना भरून आलेली असते, दु:खदैन्यांचे काळेकुट्ट मेघ जमून आलेले असतात, अशा वेळी कृष्ण जन्मतो.
कृष्ण म्हणजे व्यवस्था लावणारा, राम रमविणारा, कृष्ण आकर्षून घेणारा. कृष्ण सर्व गोकुळाला वेध लावतो. कृष्ण गोपाळ होतो. गोपाळ म्हणजे इंद्रियांचा स्वामी. तो इंद्रियांना चरू देतो, परंतु वाटेल तिकडे जाऊ देत नाही. त्या इंद्रियरूपी गायी वाटेल तेथे जाऊ नयेत, म्हणून तो गोड मुरली वाजवितो. कृष्ण सर्व इंद्रियांना सुखसमाधान देतो. त्याना ओढून, आकर्षून, संयमात राखून संगीत निर्माण करतो.
आपल्या जीवनातील अव्यवस्थेत व्यवस्था लावणारा असा हा श्रीकृष्ण असतो. रवीन्द्रनाथांनी गीतान्जलीत म्हटले आहे, 'सारा दिवस सतारीच्या तारा लावण्यातच गेला. अजून सतार लागत नाही, संगीत सुरू होत नाही.' आपली सर्वांची ही स्थिती आहे. आपल्या जीवनात मेळ नाही. जीवनाची सतार नीट लागत नाही. ही जीवनाची सतार सात तारांची नसून सहस्त्र तारांची आहे. ही अनंत तारांची हृदयतंत्री केव्हा नीट वाजणार ?
आपल्या हजारो प्रवृत्ती म्हणजेच या तारा. आज एक वाटते, उद्या दुसरे वाटते. या क्षणी अमुक करावे असे वाटते, दुस-या क्षणी दुसरेच वाटते. या हजारो वासना आपणांस नाचवीत असतात. आपली कुतरओढ चाललेली असते. एखाद्या नव-याला दोन बायका असल्या, तर त्याची किती केविलवाणी स्थिती होते ! मग या जीवात्म्याच्या त्या हजारो बायका-त्याची काय दशा करीत असतील बरे ?
सदैव चाले ओढाताण
हृदयावरतीं पडतो ताण
उरतें न मला अल्प त्राण
काय करावें ? मीं केवळ मरुनी जावें
असे जीवाला वाटू लागले.
श्रीकृष्णाला सोळा हजार नारी होत्या, असे आपण वाचतो. सोळा हजारच काय, सोळा कोटीही असतील. आपल्या या क्षणाक्षणाला बदलणा-या शेकडो मन:प्रवृत्ती म्हणजेच या नारी, म्हणजेच या गोपी. या गोपी जीवाला ओढीत असतात. परंतु गोकुळात जन्मलेला श्रीकृष्ण या गोपींची फजिती करतो. तो गोपींचे वस्त्रहरण करून त्यांना लाजवितो.
प्रत्येक प्रवृत्ती गोंडस स्वरूप घेऊन जीवात्म्याला मोह पाडीत असते. गटेच्या 'फाउस्ट' काव्यामध्ये एके ठिकाणी एक व्यक्ती म्हणते :
"मला माहीत होते, की हे पाप आहे. परंतु ह्या पापाने किती सुंदर वेश धारण केला होता ! हे पाप किती गोड व सुंदर दिसत होते !'
परंतु श्रीकृष्ण या गोपींच्या बाह्य रूपरंगावर भुलत नाही. तो त्यांचे खरे स्वरूप प्रकट करतो. त्यांचे आतील ओंगळ व हिडिस स्वरूप त्यांच्या निदर्शनास आणून देतो. त्यांची लाक्षणिक वस्त्रे दूर करतो. त्या त्या दुष्ट प्रवृत्ती मग लाजतात. त्या नरमतात, विरमतात. त्या श्रीकृष्णाच्या चरणी रत होतात, 'बा कृष्णा ! आता तू सांगशील तसे वागू. तू सांगशील ते करू. तू आमचा स्वामी,' असे त्या हात जोडून म्हणतात.