भारतीय संस्कृती 141
याला आर्यधर्म म्हणतात. याला अनासक्त आर्यकर्म म्हणतात. हा गीतेचा संदेश. हा भारतीय संस्कृतीचा महान विशेष. हेच रामचरित्राचे रहस्य.
भारतातील बलोपासना या ध्येयासाठी सुरू होऊ दे. ती सुरू झाली आहे. आज हे ध्येय युगधर्म होत आहे. आज स्पेनमधील पददलितांची बाजू घ्यावयास आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक शिरकमळे वाहात आहेत. जगात न्यायी व अन्यायी दोनच पक्ष राहणार. राम आणि रावण दोनच पक्ष. हिंदु-मुसलमान पक्ष ही फार जुनी गोष्ट आहे. जग झपाट्याने पुढे जात आहे. खरे म्हटले तर भारतीय संस्कृतीच्या उपासकांना हा युगधर्म आधी कळला पाहिजे.
भारतीय संस्कृतीची महान ध्येये पूजणा-या राष्ट्रीय सभे, तुझे अनंत उपकार ! तुझी आज थट्टा होईल. जातीय मुसलमान तुला दगड मारतील. जातीय हिंदू तुला दगड मारतील. तुला हुतात्मत्व स्वीकारावे लागेल. भरडणा-या जातीच्या दोन तळ्या असतात. मोत्यासारखे टपोरे ज्वारीचे दाणे भरडणे हे त्या दोन्ही तळ्यांचे काम असते. सनातनी हिंदू व सनातनी मुसलमान, जातीय हिंदू व जात्याय मुसलमान दोहोंकडून तुला भरडतील. परंतु भरडलेली तू त्यांच्याच उपयोगी येशील. ते ज्वारीचे पीठ भरडणा-यालाच पुष्टी देईल !
हे दिव्य- स्तव्य राष्ट्रीय सभे ! तू जी थोर बलोपासना शिकवीत आहेस. ती एकदम फोफावणार नाही. या जातीय कर्दमात जे बी तू पेरू पाहात आहेस ते तुडवले जाईल. परंतु ते बी मरणार नाही. बर्फाच्या ढिगा-याखाली अनेक वृक्षांची बीजे असतात. ती मरत नाहीत. प्रचंड ओक वृक्ष त्यातून निर्माण होतात. त्याप्रमाणे तू पेरलेले दाणे एक दिवस वर येतील. ते फोफावतील, वाढतील आणि या भारताला खरी शांती मिळेल ! भारताच्या द्वारा जगालाही ती मिळेल !
माझ्या डोळ्यांना तो देखावा दिसत आहे. 'जगातील पिळले जाणा-यांनो, एक व्हा' अशी घोषणा आज होत आहे. जागतिक संघटनेचे हे मंगल वारे वाहात आहेत. हे वारे भारतीय संस्कृतीचेच आहेत. भारतात या वा-यांचे स्वागत होईल. या वा-यांना भारत माहेरघर वाटेल. कारण डबकी करून न राहता मानवजात ओळखा अशी शिकवण येथील थोर पूर्वजांनी दिलेली आहे. क्रांतिकारकांचा मुकुटमणी लेनिन मला परका नाही वाटत. माझा भगवान श्रीकृष्णच मोरमुकुटपीतांबर सोडून हॅट, बूट, सूट घालून माझ्यासमोर उभा आहे असे मला वाटते. तो गोकुळातील लोणी चोरून गरिबांना वाटणारा श्रीकृष्णच मला लेनिनमध्ये दिसतो. अन्यायाच्या बाजूला उभे असलेले सगेसोयरे एका रक्ताचे व एका जातीचे असले, तरी त्यांच्याशी लढ, असे सांगणारा श्रीकृष्णच मला लेनिनमध्ये दिसतो. त्यावेळच्या त्रैगुण्यविषयक वेदांविरुध्द बंड करणारा, 'स्त्रिया वैश्यास्तथा शूद्रा: ते पि यान्ति परां गतिम्' असे म्हणून मोक्षाची दारे खाडखाड सर्वांना उघडणारा, स्वर्गात अप्सरा व अमृताचे पेले मिळतील अशा लाळघोट्या व जिभलीचाट्या पुष्पितावाणीच्या वेदवादरतांची टर उडविणारा, 'स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिध्दिं विन्दति मानव:' असे सांगून श्रमाचा सार्वभौम धर्म स्थापून यज्ञयागादिकांचा धर्म दूर करणारा, 'यथेच्छसि तथा कुरु' असे सांगून पुन्हा बुध्दिस्वातंत्र्य देणारा, असा हा जो महान क्रांतिकारक श्रीकृष्ण तो मला लेनिनमध्ये दिसतो.
श्रीकृष्णाची तीच थोर ध्येये, भारतीय संतांची तीच मानव्याला ओळखणारी ध्येये, आज जगात व या भारतात पुन्हा दिसू लागली जात आहेत. हृदय विशाल व शुध्द होत आहे. बुध्दीचा दिवा पेटवला जात आहे. गायत्रीमंत्राची उपासना पुनश्च नव्याने सुरू होत आहे, आणि या ध्येयासाठी मध्यंतरी लुप्त झालेली परंतु आज पुन्हा प्रकट होणारी जी ही अभिजात भारतीय ध्येये, यांसाठी श्रमावयास, झिजावयास व मरावयास नवसंघटना होत आहे. नवबलोपासना होत आहे. धन्य ! त्रिवार धन्य आहे हे दृश्य ! जो जो भारतीय संस्कृतीचा खरा अभिमानी असेल, अनासक्त आर्यजुष्ट कर्मधर्म शिकविणा-या गोपाळकृष्णाचा भक्त असेल, तो तो राष्ट्रीय सभेच्या बलसंघटनेत शिरल्याशिवाय राहणार नाही !