भारतीय संस्कृती 36
रामाने विचारले, “कोणता इतिहास?”
शबरी म्हणाली, “रामा, ऐक. एकदा मतंग ऋषी आश्रमात जळण नव्हते म्हणून मनात विचार करीत होते. येथे मतंग ऋषींचा आश्रम होता. त्यांच्या आश्रमात पुष्कळ विद्यार्थी असत. आश्रमात दूरदूरचे ऋषिमुनीही काही दिवस येऊन राहात. पावसाळा जवळ येत होता. पावसाळ्यासाठी चार महिने पुरेल इतके जळण साठवून ठेवण्याची जरूरी होती. परंतु विद्यार्थी निघेनात. शेवटी वृद्ध मतंग ऋषी खांद्यावर कु-हाड घेऊन निघाले. आचार्य निघताच सारे छात्रही उठले. आश्रमातील पाहुणेही निघाले. सारे दूर रानात गेले. वाळलेली काष्टे त्यांनी तोडली. मोठमोठ्या मोळ्या त्यांनी बांधल्या. त्या मोळ्या डोक्यावर घेऊन सारी मंडळी परत फिरली.
“रामा! ते भर उन्हाळ्याचे दिवस. प्रखर ऊन पडले होते. सारी मंडळी घामाघूम होऊन गेली होती. त्यांच्या अंगप्रत्यंगांतून घाम निथळत होता. तो घाम जमिनीवर गळत होता. तिस-या प्रहरी सर्व आश्रमात परत आले. त्या दिवशी मग सुट्टी होती. सारे श्रान्त होते, थकलेभागले होते. लवकर झोपले.”
“पहाटे मतंग ऋषी उठले. सारे विद्यार्थी उठले. स्नानाला निघाली मंडळी एकदम सुगंध आला. त्या मंद मंद उष:कालीन वा-यांच्या झुळकांबरोबर प्रसन्न वास येऊ लागला. तसा सुगंध पूर्वी कधीही आला नव्हता. ‘कोठून येतो वास, कोठून येतो वास’, असे सारे विस्मयाने बोलू लागले. शेवटी मतंग ऋषी म्हणाले, ‘जा रे पाहून या.’ मुले हरिणाप्रमाणे उड्या मारत निघाली, तो त्यांना काय दिसले? ज्या ज्या ठिकाणी रानातून मोळ्या आणीत असताना घाम गळाला होता, त्या त्या ठिकाणी एक एक सुंदर फूल फुललेले त्यांना दिसले! रामा, ही घामातून निर्माण झालेली फुले आहेत!”
ज्या वेळेस रामायणात मी हे वाचले, त्या वेळेस मी नाचलो. मी गहिवरलो. “घर्मजानि कुसुमानि।” घामातून निर्माण झालेली फुले ! निढळाचा घाम ढाळणा-या आपल्या मुलांकडे भूमाता जणू शत डोळे उघडून पाहात होती. ती फुले नव्हती, भूमातेचे ते प्रेमळ पवित्र डोळे होते! माझी मुले कशी श्रमताहेत ते ती पाहात होती. मी मनात विचार करू लागलो. जगात कोणते पाणी श्रेष्ठ, असा मी स्वत:ला प्रश्न विचारला. गंगा-यमुनांचे, कृष्णा-गोदावरीचे, सप्तसमुद्रांचे पाणी का पवित्र? स्वाती नक्षत्राचे का पाणी मोलवान? पश्चात्तापाने डोळ्यांतून अश्रू येतात ते का पवित्र? प्रेमळ माणसाचे स्मरण होऊन डोळे डबडबतात, त्या अश्रुधारा का सर्वांत थोर?
मी म्हटले, “श्रमजीवी माणसाच्या अंगातून गळणारे घामाचे पाणी हे सर्वांत थोर.” ते पाणी जगाचे पोषण आहे. देव पाऊस पाडील; परंतु शेतकरी स्वत:च्या घामाचा पाऊस जर शेतात पाडणार नाही, तर काय पिकणार आहे? माणसांना दाणे मिळणार नाहीत. पाखरांना दाणे मिळणार नाहीत. सारी सृष्टी मरेल!
इंग्लंडमधील अत्यंत प्रतिभावान व थोर मनाचा कवी शेले एके ठिकाणी म्हणतो, “जगातील सर्वांत थोर कलावान कोण? तर शेतकरी:” किती यथार्थ आहे त्याचे म्हणणे ! भगभगीत उजाड दिसणा-या जमिनीला तो हिरवी हिरवीगार करतो. फुलाफळांनी तिला नटवितो, हसवितो; परंतु अशा त्या थोर शेतक-याची आज काय स्थिती आहे? या ऋषींच्या भूमीत त्या शेतक-याची काय दैना आहे? सारे त्याला तुच्छ लेखतात. सारे त्याला अपमानितात. त्याला कोणी गादीशी बसविणार नाहीत. सारे त्याला दारात बसवितील. ज्या दिवशी शेतक-याला प्रथम लोड मिळेल त्या दिवशी भारतीय संस्कृती लोकांना समजू लागली असे मी म्हणेन. परंतु आज सर्वांना पोसणा-या शेतक-याच्या जीवनवृक्षावर बांडगुळाप्रमाणे जगणा-यांनाच मान मिळत आहे! किती विद्रूप व नीच आहे हा देखावा!