भारतीय संस्कृती 39
कालची चूल फुटली, आज नवीन घातली. पहिली मोटर बिघडली, नवीन घेतली. पहिला दिवा बिघडला, नवीन घेतला. अशा प्रकारे ही साधने बदलत आहेत. परंतु ही क्षर साधनेही पुरुषोत्तमाचेच रूप. ही क्षरसृष्टीही पूज्यच आहे.
मोठमोठ्या कारखान्यांतील मजूर हीसुद्धा एक प्रकारची क्षरसृष्टीच आहे. कारखाना शंभर वर्षे चालेल. जुने मजूर गेले, नवीन आले. मजूर नेहमी बदलत राहतीलच. परंतु मजूर कोठलाही असो, तो पवित्रच आहे. हे बदलणारे मजूर पुरुषोत्तमाचीच रूपे आहेत. त्यांची पूजा करणे हे कर्तव्य आहे.
कारखानदारांच्या दृष्टीने मजूर क्षर आहे. परंतु तो मजूर अक्षरही आहे. त्याच्यात अमर परमात्मा आहे. तो कधी नष्ट होत नाही. त्या अमर परमात्म्याची ओळख तो मजूर स्वतःच्या सेवाकर्माने करून घेईल.
सेवेचे कर्म उत्कृष्ट व्हावयास पाहिजे असेल, तर साधने पवित्र माना. सजीवनिर्जीव साधने पवित्र माना. त्यांना प्रसन्न ठेवा. दुसरा देव नाही, दुसरा धर्म नाही. जो कारखानदार मजुरांना देवाप्रमाणे मानील, त्यांना स्वसेवेची पवित्र साधने मानून त्यांना संतुष्ट ठेवील, त्याच्याहून देवाला कोण अधिक प्रिय वाटेल ?
भारतीय संस्कृतीच्या उपासकांनी ! कोणतेही कर्म-सेवाधर्म तुच्छ मानू नका. मरेपर्यंत सेवा करा. स्वतःच्या आवडीचे कर्म करा. स्वतःचा वर्ण ओळखून तदनुसार वागा. ते ते कर्म उतकृष्ट करा. त्या कर्माची सजीन-निर्जीव साधने पवित्र मानून त्यांची काळजी घ्या; आणि अशा रीतीने स्वकर्म उत्कृष्ट करून त्या जनताजनार्दनाची, या समाज-पुरुषांची पूजा करा. हा श्रीगीतेचा धर्म आहे. परंतु या धर्माची खरी ओळख आज कितीकांना आहे बरे ?