भारतीय संस्कृती 65
तैं गजबजो लागे कैसा। व्याधे विंधिला मृगु जैसा।।
बाणाने हरिण विद्ध व्हावा, घायाळ व्हावा, त्याप्रमाणे मानसन्मानांनी तो गजबजून जातो, गांगरून जातो.
तुकारामहारांजी कीर्ती ऐकून शिवाजीमहाराजांनी त्यांच्याकडे पालखी वगैरे पाठविली, घोडेस्वार पाठविले. पालखीत घालून तुकारामांना मिरवीत आणावे असे शिवाजीमहाराजांस वाटले. परंतु तुकाराम कष्टी झाले. आपल्या सत्कर्माला वैभवाची लागलेली फळे पाहून त्यांना वाईट वाटले. ते देवाला म्हणाले, “देवा ! ह्या दिवट्या, हे घोडे, ह्या पालख्या, ही छत्रचामरे, कशाला हे सारे ? मला का याची आवड आहे ?” तुकारामांना सेवेसाठी सेवा पाहिजे होती. मोक्षाचे फळही त्यांना नको होते. मोक्षावरसुद्धा त्यांनी लाथ मारली.
“दंभ कीर्ति मान। सुखे टाकितो थुंकून।।
जा रे चाळवी बापुडी। ज्यांना असे त्याची गोडी।।”
असे तुकाराम स्वच्छ सांगत आहेत. “कीर्तीला, मानाला आम्ही झुगारुन दिले आहे. त्याच्या पाठीमागे लागून कर्मच्युत होणारी दीनदुबळी अहंपूज्य माणसे आम्ही नाही त्या गोष्टींनी च्युत होणारी दुसरी माणसे आहेत.”
ही दृष्टी शेवटी माणसास आली पाहिजे. कर्म म्हणजेच मोक्ष, मोक्ष म्हणजेच संतोष. कर्म म्हणजेच सर्व काही. सत्कर्माची सवय झाली पाहिजे. सूर्याला जळणे माहीत. मेघाला वर्षणे माहीत, वा-याला वाहणे माहीत, संताला दुस-याचे अश्रू पुसणे माहीत. सवय झाली म्हणजे अहंकार जातो, फलेच्छा मरते. नाक सारखे श्वासोच्छवास करीत आहे. म्हणून त्या नाकाचे आपण आभार मानीत नाही. नाकालाही वाटत नाही की आपण फार मोठे काही करीत आहोत. तसे आपले झाले पाहिजे. स्वतःच्या मुलाचा शेंबूड आई जितक्या सहजतेने, फलविरहित हेतूने काढते, तितक्याच सहजतेने शेजारच्या मुलाचा शेंबूड काढण्याची तिच्या हाताला सवय झाली पाहिजे. प्रथम शेजारच्या मुलाचा शेंबूड काढताना ती आजूबाजूला पाहील. त्या मूलाची माता “हे काय, तुम्ही कंशाला काढलात ?” वगैरे बोलून आपला गौरव करीत आहे की नाही इकडे तिचे लक्ष असेल. परंतु पुढे पुढे हे सारे नाहीसे झाले पाहिजे. हाताचा तो सहजधर्म झाला पाहिजे.
“मामनुस्मर युद्ध्य च”
अशी भगवंताची शिकवण आहे. फळ येवो वा न येवो, सत्याची आठवण ठेवून सदैव कर्म करीत राहा. देवाचे स्मरण ठेवून कर्म करावयाचे. परंतु देवाचे स्मरण म्हणजे काय ? सच्चिदानंदाचे स्मरण. मोझे कर्म सच्चिदानंदरुपी परमेश्वराचे पूजन करणारे झाले पाहिजे.