भारतीय संस्कृती 94
''सभेला जिंकून घेणारी, इंद्राला आवडणारी, अत्यंत अपूर्व अशी ही मेधा आहे. त्या मेधेसाठी मी खटपट करतो. ज्या मेधेची देव व पितर उपासना करितात, त्या मेधेने मला मेधावी करा. मी बुध्दीमान होऊदे. सत्प्रवृत्तीचा होऊ दे. चांगल्या गोष्टींची पूजा करणारा, श्रध्दावान, सत्यनिष्ठ असा होऊ दे. मला ब्रह्मचर्याच्या तेजाने शोभणारा होऊ दे. मला कीर्तिवान होऊ दे. मला धीरव्रत होऊ दे . मला उत्कृष्ट वक्ता होऊ दे. कोणतही चर्चेच्या प्रसंगी माझ्या बुध्दीच्या प्रभावाने मला शोभू दे. ''
असे हे सुंदर मंत्र आहेत. उपनयन म्हणजे बुंध्दीसंपन्न होण्यासाठी सुरू केलेले व्रत. हे जे ज्ञान मिळवावयाचे, ही जी धारणाशक्ती मिळवावयाची, ही जी अभंग स्मरणशक्ती मिळवावयाची, त्याच्यासाठी ब्रह्मचर्य हवे. ब्रह्मचर्याशिवाय एकाग्रता नाही. ब्रह्मचर्य म्हणजे सर्वेन्द्रियांची शक्ती एका ध्येयावर केन्द्रीभूत करणे. भिंगातून सूर्याचे किरण पुंजीभूत करुन ज्याप्रमाणे ठिणगी पाडतात, त्याप्रमाणे सर्वत्र जाऊ पाहणा-या इंद्रियांची शक्ती एके ठिकाणी आणून तिच्यातून अद्भूत तेज निर्माण करणे म्हणजे ब्रह्मचर्य.
भारतीय संस्कृतीत ब्रह्मचर्याचा अपार महिमा गाइलेला आहे. ब्रह्मचर्य म्हणजे काय? ब्रह्मप्राप्तीसाठी जी वागणूक ठेवावयाची, ती वागणूक म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मप्राप्तीचे आचरण म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे आपले ध्येय. आपणांस जे परमोच्च प्राप्तव्य वाटते, ते आपले ब्रह्म. ज्याच्यासाठी जगावे. किंवा मरावे असे वाटते, ते आपले ब्रह्म.
सर्व शक्तींचा उपयोग केल्याशिवाय ध्येय प्राप्त होत नाही. ध्येय ज्या मानाने उच्च, त्या मानाने अधिकच सामर्थ्य लागणार. सर्व सामर्थ्य असूनही ध्येयापर्यंत हात पोचत नाहीत व मग आपण प्रार्थनेची कास धरतो. स्वत:चे सामर्थ्य इकडे तिकडे थोडेही खर्च होऊ न देता, सर्वाच्या सर्व ध्येयावर ओतूनही जेव्हा ध्येय दूर राहते, तेव्हाच ख-या प्रार्थनेचा उदय होतो. उपनिषदांत एकेक अक्षर शिकण्यासाठी सहस्त्र वर्षे ब्रह्मचर्यपालन करून राहात, असे उल्लेख आहेत. ज्ञानाचा एक कण राहावे, याचे उपनिषदांत एके ठिकाणी फार सुरेख वर्णन आहे, ''तरुणाने सत्प्रवृत्तीने असावे. दृढ अभ्यासी, आशावान, दृढ निश्चयी व सामर्थ्यसंपन्न असा तरुण असावा. ही सर्व धनधान्ययुक्त पृथ्वी त्याच्या पायाशी लोळण घेईल. ''
''अशा तरुणाने नाच-तमाशे पाहू नयेत. निरनिराळया बैठकांना जाऊ नये. गप्पा मारीत बसू नये. त्याने एकान्तात बसून अध्ययन करावे. गुरु वेडावाकडा वागत असला तरी त्या गोष्टीचे अनुकरण करू नये. जरूर पडेल तितकेच स्त्रियांशी बोलावे. गोड स्वभावाचा, प्रेमळ, शांत विनयी दृढ निश्चयी निरलस, दैन्यहीन असा युवक असावा. पदोपदी त्याने संतापू नये. कोणाचा मत्सर करु नये. सांजसकाळ गुरुकडे पाणी वगैरे भरावे. रानात जाऊन मोळी आणावी आणि अध्ययन करावे. ''
अशा प्रकाराचा आदर्श उपनिषदांनी ठेविला होता. उपनयनाच्या वेळेसही उपदेश करताना. ''स्वच्छ राहा. तू ब्रह्मचारी आहेस. दिवसा झोपू नकोस. सदैव कर्मात मग्न राहा. आचार्याची सेवा करून ज्ञान मिळव. ज्ञानप्राप्ती होईपर्यंत ब्रह्मचर्य पाळा'', वगैरे सांगितले आहे.
ब्रह्मचर्य पाळणे ही गोष्ट सध्याच्या काळात फार कठीण होऊन बसली आहे. सभोवतालचे वातावरण फार दुषित झाले आहे. या सिनेमांनी, फोनोंनी, रेडिओंनी सर्व वातावरण दुबळे व नेभळे करून टाकले आहे. सर्वांची मने जशी पोखरली गेली आहेत. लुसलुशीत व भुसभुशीत कारभार!