नकटी
अभावाचे नाक लावुनिया शोभे ।
वरदळ भक्ती तैशावरी शोभे ॥ १ ॥
नकटीचा गुण उपहास लोकां ।
दांभिक भक्ती तैशी तुम्ही देखा ॥ २ ॥
काजळ कुंकू माथा वेणी ।
नकटी सुंदर म्हणेल कोणी ॥ ३ ॥
नकटीचा संग करी तोचि साजे ।
दांभिक भजनाते देवचि लाजे ॥ ४ ॥
एका जनार्दनी भावेविण ।
कुसराचे भजन ते नकटेपण ॥ ५ ॥