जोहार
देहपूरचें दिले ठाणें । जिवाजीस बोलावणें । मग पळूं लागले रानोरानें । कोण सोडवी त्याकारणें । की जी मायबाप जोहार ॥ १ ॥
येईल यमाजीची पाळी । कोण तेथें कोणा सांभाळी । जिवाजी पळतील गांवचे बळी । होईल फजिती सारी की० ॥ २ ॥
अवघे राहतील घरचे घरीं । तुम्ही पडाल चौर्यांयशीच्या फेरी । किती जन्म वेरझारी । करा विचार याचा की० ॥ ३ ॥
शरण एका जनार्दनीं । मायबाप संत धनी । तेचि चुकवितील यातनी । धरा विश्वास की जी मायबाप जोहार ॥ ४ ॥