पाळणा
सद्गुरुवचनें जन्म जें झालें । माया जठरीहुनी वेगळें केलें ।
अहंकाराचें गुल्ब तात्काळ तोडिलें । वासना समूळ नाळ खोडिलें ॥ १ ॥
जो जो जो परियंदे सहज । रात्रंदिवस नित्य लागली निज ॥ध्रु०॥
पिटिलें जेंगट अनुहात ध्वनी । शांति क्षमा दया बोलती कामिनी ।
अपरूपें झालें स्वयें लक्षणीं । टकामकां पाहे कोहं सोहंपणीं ॥ २ ॥
उपजत पायाळ पैं झाला देख । अक्षय ठेवणें लाधले आशेख
अविद्या गर्भीचें हारपलें दुःख । नयन पुंजाळलें अर्धोन्मिलित ॥ ३ ॥
अवलोकनालागीं जन आचार्य आला । अशेष अविद्येचा त्यागु केला ।
असमाय आनंद आनंदें न्हाला । उसळला बिंदु पूर्वज समूह मिनला ॥ ४ ॥
झाली दृष्टादृष्टी बाणले निरुतें । पूर्ण चंद्रक्षीर सागरीं भलतें ।
यापरी आनंद कवळी नभातें । सबराभरीत कवण आवरीते ॥ ५ ॥
चिद्रत्नाच्या अंजुळी भरुनी वृत्तीच्या हातीं । स्वानंदाच्या मध मुखीं घालिती ।
जनित जन्ममळ निषेध धुती । आपेंआप नवल झाली प्रचीती ॥ ६ ॥
स्वानुभाव ब्रह्मसुत्र देतां पै झाला । अखंड अनुस्फुत मध्यें बांधला ।
सभोंवता आप वर्गु समूह निमाला । परं परमेष्टी सुखें सुखावला ॥ ७ ॥
ज्योतीच्याही ज्योती उजळुनी आरती । ओंवाळिला देखा अखंड दीप्ती ।
मध्यमा वैखरी परा पश्यन्ती । एकेश्वरे चारी परतोनि गाती ॥ ८ ॥
तंतू सूक्ष्मदशे वासना होती । सद् युक्तीच्या वळियेल्या वाती ।
स्वरूपीं लाविला दिपु स्वयंभस्थिती ॥ ९ ॥
दहा दिन चिलस वासनें केलें । इतुकेनि स्पर्शाचें बव फितलें ।
आपपरावेनी सकळ शुद्धत्व आलें । ब्रह्मरस तेथें पारणें केलें ॥ १० ॥
क्रमुनी अकराही पलख मुहूर्त । स्थानु निर्वाळिला अक्षर अव्यक्त ।
निरालंब पाळाण लाविला तेथें । अनुभव श्रृंखळा आलिय औचित ॥ ११ ॥
मचवे शोभले पुरुषार्थ चारी । निष्काम पाटिया बाणल्या त्यावरी ।
सबाह्य विणियेली विवेकाची दोरी । त्यामाजीं पहुडला सुख निद्रेवरी ॥ १२ ॥
सानु सानु परिये देतु उन्नत उन्मनीं । चिराई तूं बा कुंज निरंजनीं ।
माझिये दृष्टी तुज लागे बा झणीं । स्वयें परतली इडापिदा घेउनी ॥ १३ ॥
निजीनिज सांडुनी अवस्थात्रया । लोण करूं गेली साक्षी आणू तूर्या ।
आपणिया आपण होऊनियां तळिवरिया । सहजीं सहजपणें असणें सहज जया ॥ १४ ॥
मौनामौन पडलें शब्द शिराणी । सहज स्थिति येथें धरियेली कानीं ।
पितामहाचा पिता सुभानु वंश वर्णनीं । निजसुख घेतलें एका जनार्दनीं ॥ १५ ॥