मानभाव
जाहलो आम्ही मानभाव ।
आमच्या देही भॊळा भाव ॥१॥
आम्हा दुजेपणा नाही ।
हासू खेळू भलते ठायीं ॥२॥
जपू सदा कृष्णनाम ।
नाही आणिकांचे काम ॥३॥
करु गडबडगुंडा ।
मारू यमाचिया तोंडा ॥४॥
शेंदरे हेंदरे देव ।
तया कोण पूजी वाव ॥५॥
एका जनार्दनी ठाव ।
आम्ही जालो मानभाव ॥६॥