मेसाबाई
मेसको मैराळ तूं मसणीचे आई । धांव पाव वेगीं माझें नमन तुझे पायीं ॥ १ ॥
पंढरीचा हनुमान यातें कोण कोड घाली । जाळियेली लंका येणें तोंड केली काळीं ॥ २ ॥
दोंदील गण्या यातें पाचारुनी काई । उंदरावर बैसुनी केव्हां धांवेल आई ॥ ३ ॥
कैलासीचा शंभु बाई आवडेना मना । लागला भिल्लणीपाठीं कोठें पाहूं त्याला ॥ ४ ॥
लक्ष्मीचा वर खोटा आवडेना आम्हां । धरियेली माव तेणें मारियेला मामा ॥ ५ ॥
एक सेला एक मेला एक सिंदिचा घडा । घेऊनियां आई आमुचें उकली तूं कोडा ॥ ६ ॥
इतुकें घेउनी पाव तूं आम्हांसी । एका जनार्दनीं विनवितों तुजसी ॥ ७ ॥