भूत
पिता सांगे पुत्रासी । बाळा नको जाऊं पंढरीसी । तेथें आहे थोर विवशी । ती तुज गिळील समुळेंसी ॥ १ ॥
भूत दारुण खेचर मोठें । तें नांदे भींमातिरीं वाळुवंटी । तेणें झडपिलें मोठें मोठें । तें बा नये घरदार वाटें ॥ २ ॥
अंबरीष रुक्मांगदा । मयूरध्वजाची थोर आपदा । हनुमंता झाली थोर बाधा । तोचि नाचे समाधी सदा ॥ ३ ॥
भूत लागलें प्रल्हादासी । तेणें मारविलें आपुले जनकासी । भूत लागलें त्या बळीसी । नेउनी घातियेला पाताळासी ॥ ४ ॥
भूत लागलें नारदमुनी । तो हिंडे त्रिभुवनीं । देह भ्रांति सांडोनी । गेला भुतामाजीं मिळोनी ॥ ५ ॥
धुरू लेंकरू कोडिसवाणें । त्याचें खुंटलें येणें जाणें । तोही झडपिला भूतें येणें । आणिक थोर थोर घेतले प्राणें ॥ ६ ॥
भूतें झडपणी केली बहुतां । सिद्ध ऋषी मुनी समस्तां । तेही न धरिती मागुता । अवघीं भूतेंच होतीं सर्वथा ॥ ७ ॥
येणें मारिले असंख्यात । सहस्त्रार्जुन थोर बळिवंत । हिरण्यकश्यप असुरनाथ । रावण कुंभकर्ण समस्त ॥ ८ ॥
कंसासुर आणि पूतना । शिशुपाळ वक्रदंत राणा । मागधादी काळयवना । कौरवांची सकल सेना ॥ ९ ॥
नाहीं राहत एके स्थानीं । सद्यां होतें गोवर्धनीं । तें बा पुंडलिकें मंत्रोनी । उभे केलें येथे आणोनी ॥ १० ॥
चंद्रभागा पुष्पावती । सायंकाळीं पद्मतीर्थी । करी रानामधीं वस्ती । नको धरूं त्याची संगती ॥ ११ ॥
ऐक सांगतों तुज विचारूं । भूतें झडपिल्या तुज काय करूं । एका जनार्दनीं निर्धारू । तेणें केला भूतांचा अंगिकारू ॥ १२ ॥