कोडे
नाथाच्या घरची उलटी खूण ।
पाण्याला लागली मोठी तहान ॥ १ ॥
आत घागर बाहेर पाणी ।
पाण्याला पाणी आले मिळोनी ॥ २ ॥
आजी म्यां एक नवल देखले ।
वळचणींचे पाणी आढ्या लागले ॥ ३ ॥
शेतकर्याने शेत पेरले ।
राखणदाराला तेणे गिळीले ॥ ४ ॥
हांडी खादली भात टाकला ।
बकर्यापुढे देव कापिला ॥ ५ ॥
एका जनार्दनी मार्ग उलटा ।
जो जाणे तो गुरुचा बेटा ॥ ६ ॥