अष्टपदी
वांकडा म्हणे कृष्णजी बापा मीं एक देखिलें भूत रे ।
त्याचें विष जळुनी गेलें शेष राहिलें किंचित रे ।
देहाविण छळितो तेथेंचि पीडितो त्या ठायां असें मळमूत्र रे ।
त्यांनीं जिंकिले कोण कोण ते त्यासी जिंकिल कोण तो रे ॥ १ ॥
धोंगडें माझें बोलणें कान्होबा धोंगडें माझें बोलणें ॥ध्रुव०॥
जुनाट जोगडा काळाचा काकडा डोंगरीं रहातो भोंडा रे ।
झडपिला हांवे नागवाचि धांवे पाठीसी लागला भिलगोंडा रे ।
कर्दळी खोपा नेटका रूपा पाहूनि भुलला तोंडा रे ।
जग अंधारी महा भ्यासुरी अपार चालिला वीर्याचा लोंढा रे ॥ २ ॥
कुल्लाळ हाडाचा बाप चहाडाचा अखंड घडतो मडकीं रे ।
त्यासी एक भूत संचार जाला हिमालयाच्या खडकीं रे ।
भूत वर्याची नोवरी पाहूनि जिवास भरली धडकी रे ।
कोणी एके वेळीं पाठीशी लागला भेडसाविती लेक लाडकी रे ॥ ३ ॥
नंगाचे दंदी नंगाचि खांदी अति हाडाचा ढेंगा रे ।
त्यासी एक भूतसंचार जाहला येऊनि जडला अंगा रे ।
सुत अंधाचा परांगनेचा चिरे फेडितो कांगा रे ।
त्यासी एक वृक्ष पुढें भेटला डांगानें मोडिला टांगा रे ॥ ४ ॥
गंगामाझारी संग ढोवरीसी रमला तपो गर्वे रे ।
त्यासी एक पुत्र जळींजन्मला ।
त्यानें केलीं अठरा पर्वे रे ।
तो एक साक्षात वेदो नारायण ।
बोलणें त्याचें बरवें ।
कुरंगीचें पाडस दुबकिलें अयुघ्यापूर मिळविलें रे ॥ ५ ॥
डोळीयाचे जळीं एक द्विज जन्मला तेंचि त्याचें वाहन रे ।
बापापरीस एका तोंडानें आगळा तारका केलें हनन रे ।
शैल्यात्मजेच्या सवतीचा तनय तुझ्या हातीं त्याचें दहन रे ।
दिवा अंधारीं जो कां रमला नातवंड त्याचें गहन रे ॥ ६ ॥
लंगोटबंदा ढुंगासी शेपूट अझुन जीत काळतोंडा रे ।
रात्रींतून ज्यानें शेपुटी बांधोनि संकटीं आणिला धोंडा रे ।
त्रिभुवनासी तो देवऋषी बाप जयाच्या तोंडा रे ।
सोळा सहस्त्र नारी भोगुन ब्रह्मचारी तूं एक म्हणविसी लंडा रे ॥ ७ ॥
वांकड्यानें आहाणा घातला जाण उकलील तो विरळागत रे ।
पदापदाचे अर्थ करी जो तो एक असे बहुश्रुत रे ।
आठा कडव्याची अष्टपदी गाइली तो एक जाणा अद्भुत रे ।
एका जनार्दनीं विनवित असे भूत ।
नव्हे कान्होबाचा सूत रे ॥ ८ ॥