सौरी
जातिभ्रष्ट जाली सौरी हिंडे दारोदारीं । सांवलें उचकुनी जगासी दावी डौर वाजवी करीं ॥ १ ॥
चाल सख्या रामा । सुख होईल आम्हां ॥ध्रु०॥
हागरा दादल्या पादरी बायकु जावई देखोनी हांसे । घरची सून नागवी नाचे पोटीं पोर पिसें ॥२ ॥
शेंबडा व्याही चिपडी विहीण दोघां प्रीत मोठी । विहीण लाजून हळुच पाहे व्याही नाक चाटी ॥ ३ ॥
बाईल बाहीरख्याली दादला तिचा भोळा । पर पुरुष पाहूनियां खुणाविती डोळा ॥ ४ ॥
ऐशी सौरी गमजा करी डौर छंदें नाचे । एका जनार्दनीं पायीं अखंड नाम वाचे ॥ ५ ॥