जोहार
जोहार मायबाप जोहार । वेसराख्याचा धंदा । स्वरूपीं सावध होतो सदा । घरींहुनी फांकूं नका की जी मायबाप ॥ १ ॥
विषयाच्या गलबलीं गुंतूं नका । बहुत बाकी वाहूं नका । दांडोरा पिटिये सारखा । बाकी झाडा की जी मायबाप ॥ २ ॥
भावभक्ति धरा कुळवाडी । चित्तांतून काढा अविद्येची पिडी । नाहीं तर पडेल प्रपंचाची बेडी ।
ते नंतर बहु दुःख होईल की जी मायबाप ॥ ३ ॥
तेणें दुःखें विवळूं लागाल । आपले मायबापासी बोलावूं जाल । घरसंसार भोगूं लागाल । ऐसें बाकीचें फळ की जी मायबाप ॥ ४ ॥
महार बोले म्हणूनि जाल गर्वे । स्वहित होईल तें करा बरवें । बापांनों डोळे झाकूं नका की जी मायबाप ॥ ५ ॥
डोळें झांकून ठेवाल बाकी । तरी काळाची धरणी होईल निकी । जरी झाली माय सुखी तरी कोण सोडवील की जी मायबाप ॥ ६ ॥
जो वेसराख्याचे मिळणीं असे । त्यासी दुजेपणाचा धाक नसे । सद्गुरुचरणीं विश्वासें । आपुलें मूळ टाळावें की जी मायबाप ॥ ७ ॥
एका जनार्दनीं वेसराखा । तेणे चुकविला जन्ममरणाचा आडाखा । जरी आत्माराम होय सखा ।
त्याचे चरणीं वस्ती की जी मायबाप ॥ ८ ॥