महारीण
महारीण हिंडे गांवांत । पाटीलबावा आहेत झोंपेंते । महारीण बहुतीं फिरत । पाटील झोंपेंत झाले मस्त ॥ १ ॥
मायबाप जोहार । मी सांगतें तें ऐका साचार । तुमची नगरी करा हुशार । आतां येतील यमाजी हुद्देदार ॥ २ ॥
झोंप सांडा आतां उठाउठी । पुढें आली यमाजीची चिठ्ठी । जाब देतां व्हाल हिंपुटी । मारील गांडीवरी जेव्हा काठी ॥ ३ ॥
मायबापाचें न चाले कांहीं । भाऊ बहिणी राहती ठायींच्या ठायीं । सेजेची बायको पुसेना कांहीं । इष्ट मित्र कोणाचे भाई ॥ ४ ॥
जोंवरी तुमचे हातीं आहे । तोंवरी कराल तें होय । आयुष्य सरल्या कराल काय । भोयीं न टेकती पाय ॥ ५ ॥
म्हणोनी येतें काकुलती । धरा धरा सत्संगती । तेणें होईल तुम्हां विश्रांती । एका जनार्दनीं करी विनंती ॥ ६ ॥