सटवाई
नमो आदिमाया भगवती । हरिहर ध्यानाची आकृती । चंद्र सूर्य कानीं लोळती । गळां वैजयंती शोभती । बया बैस ॥ १ ॥
आली आली रे सटवाई आली ॥ध्र०॥
पांच दगड मांडुनी । वर शेंदूर आरादुनी । माथां मुगुट शोभुनी । दारवंटा पुजूनी । बया बैस ॥ २ ॥
लिंबें नारळांनीं । पूजा पूजा सटवाई म्हणुनी । नवसा पावलाची ती कर जोडुनी । बया बैस ॥ ३ ॥
चहूं वर्णांची याती । अठरा जन कपाळीं लाविती विभूती । निवद बोन करिती । वर पाळणा टांगिती बया बैस ॥ ४ ॥
कामक्रोध बकरी मारुनी । चैत्रमासीं होम करुनी । रावण कुंभकर्ण हिरण्यकश्यपूची आहुती देउनी । अंबा अष्टांग बसुनी । बया बैस ॥ ५ ॥
अष्ट गण दिक्पाळ । तेहतीस कोटी भूतावळ । अठ्यांऐशी सहस्त्र मेळ । ज्ञान टेंबा जळोन । बया बैस ॥ ६ ॥
अंबेची वर्णावया कांती । घटीं घटस्थान करिती । पुढें वेताळ भैरव नाचती । वैष्णवमेळीं कल्लोळ करिती । बया बैस ॥ ७ ॥
नऊ खंडें पृथ्वीवरी उभी राहुनी । नऊ अवतार नटुनी । शेवटीं प्रगट रूप धरोनी । कलंकीमाजीं समूळ नाश करुनी । बया बैस ॥ ८ ॥
उदो उदो शब्द गाजुनी । रावळीं भक्त हाक मारुनी । दारवंटा हात जोडुनी । अंबा स्तविली प्रीती करुनी । बया बैस ॥ ९ ॥
मग झाली अंबा प्रसन्न । सांवळें रूप प्रगटोन । एका जनार्दनीं नेम धरुनी । गेली संतांसी दर्शन देउनी । बैसविली स्वयंभुस्थानीं । बया बैस ॥ १० ॥