जोहार
जोहार मायबाप जोहार । मी निराकाराचा महार ।
सांगेन अवघा विचार । जिवाजीचा की मायबाप ॥ १ ॥
जिवाजीने सारा गाव बुडविण्याची धरली हाव ।
त्यासी मिळाले कामाजीराव । मग अन्याय सहजचि की. ॥ २ ॥
कामाजी बाजीस मिळाले । क्रोधाजी गावात सहज शिरले ।
लोभाजीचे ठाणे जोडले । मग विसरले धन्यासी की. ॥ ३ ॥
मदाजीबाबा तो जाहले मस्त । त्यांनी गाव पांगविला दरोबस्त ।
मत्सर बाबा उन्मत्त । आपआपणात मिळाले की. ॥ ४ ॥
दंभाजी म्हणविती चौधरी । सदा बसती आपुले घरी ।
धन्याची तलब आलियावरी । गांडीवर टोले की. ॥ ५ ॥
अहंकार पोतनीस कारभारी । ते जिवाजीस ठेविती धाब्यावरी ।
त्याची भरोवरी कोण करील की. ॥ ६ ॥
याची नका धरू संगती । तेणे तुमचीन चुके पुनरावृत्ति ।
एका जनार्दनी करी विनंती ।संती ऎकावी की जी मायबाप ॥ ७ ॥