गोंधळ
करुनी शुद्ध मार्ग ठाव तो पुसिला । अज्ञान ज्योति रूपें पोत पाजळिला । सज्ञान सद्बक्ति संबळ लाविला । त्रिभुवनामाझारीं तुझा गोंधळ मांडिला वो ॥ १ ॥
रंगा येई वो रंगा येई वो । माझे कुळीचे कुळदैवतें रंगा येई वो ॥ ध्रु० ॥
संकल्प विकल्प हे दोन्ही असुर । दया आणि शांति हीच जगदंबा थोर । अष्टादश पुराणें हे शोभती कर । सहा शास्त्रें तुझा वर्णिती बडिवार वो ॥ २ ॥
शुद्ध बुद्ध खंडा हातीं तेणें अंबा शोभती । अभाविक जे तयां नाहीं प्रचीती । पाहून एका जनार्दनीं जाहली तृप्ती । शरण जगदंबे तुज ध्यातसे चित्ति वो
॥ ३ ॥