गावगुंड
अरे अरे गांवगुंडा । तुझा बहुत ऐकतों झेंडा । जें येतें तें बोलतों तोंडा । हें मज गारुड्यापुढें चालणार नाहीं रे ॥ १ ॥
काय रे गारुड्या बोलला । तुझें आत्मज्ञान ठाऊक आहे मला । तूं कोणत्या गुरुपाशीं खेळ खेळला । उगाच हांकारानें पिंवळा जोंधळ केला ॥ २ ॥
पिंवळा जोंधळा केलास जरी । तरी माझी विद्या पंचाक्षरी । जा जा ऐक फुक मारीन तरी तुझ्या काळजांत घलिन सुरी ॥ ३ ॥
तुझ्या सुरीचें पाणी करीन तरी । नाही तीच तर खुपशिन तुझ्या टिरीं । बोल बोलशील राहिल उरीं गोषा पहा पां ॥ ४ ॥
गारुडी आम्हांस काय । आम्हीं दोघांची पोटें भरीत आहे । जी धर्मास देईल माय । ते खाऊन चाले उपाय । एका जनार्दनीं पाय निवांत राही रे गारुड्या
॥ ५ ॥