भटीण
मी भटीण आलें रे भटा । नको करूं रिकाम्या चेष्टा ।
काय बोलतोसि चावटा । उगीच चेष्टा करूं नको ॥ १ ॥
म्यां भटणीनें तुज पाळिलें । पाळिल्याचे बरेच उपकार फेडिले ।
माझें मज आणुन दिलें । त्यांत तुझें काय गेलें रे भटा ॥ २ ॥
मजपासूनि वेद कीं रे झाले । ते म्यां तुझ्या हातीं दिधले ।
शंकासुरानें चोरून नेले । माझ्याच भयानें ते परत आणिले रे भटा ॥ ३ ॥
त्याच्याच आधारानें मी बोलत आहें । काय रे मस्ती तुसीं आली आहे ।
मस्ती तुझी भटा ठाऊक आहे । आपले अंतरीं शोधुनी पाहे रे भटा ॥ ४ ॥
लहानाचा थोर तुला म्यां कीं रे केला । नव अवताराच्या हातीं मला ।
दहावा कलंकी राहिला । तोही जाइल विलया रे भटा ॥ ५ ॥
एका जनार्दनीं कारण । भटाचें हरपलें मीपण ।
उगाच गेला मौन धरून । चैतन्यरूप पाहिलें रे भटा ॥ ६ ॥