महारीण
जोहार मायबाप जोहार करितें । सकळ सभा स्तुति मायबापासीं सांगतें । आपल्या घरचें गार्हाणे देतें । ऐका की जी मायबाप ॥ १ ॥
तुम्ही म्हणाल कोण कोठील काई । मी तो आहे अनादिसिद्ध दाई । माझें नांव तो असे सकाई । हा तो जांवई माझ्या बापाचा की जी मायबाप ॥ २ ॥
हा तर फिरत फिरत आला । एकही नवरी न ये याच्या मनाला । माझे स्वरूप पाहून बोलता झाला । मम जनकासी की जी मायबाप ॥ ३ ॥
माझें स्वरूप देखिलें पहा नयनीं । मी तो केवळ लक्ष्मीची ज्येष्ठ भगिनी । दुसरी उपमा शूर्पणखेच्या वानी । शेखी आली लंकेहुनी । पती भक्षणार्थ की जी मायबाप ॥ ४ ॥
माझें स्वरूप देखिलें जेव्हां का । यानें माझ्या बापास मोजिला पैका । एक ढबु पैसा वरी एक आडका । वीस कवड्या की जी मायबाप ॥ ५ ॥
अषाढमासीं धरिलें लग्न । तीर्थ अमावस्या पौर्णिमा पूर्ण । भद्रा व्यतीपात जाणून । कुयोगी लग्न धरिलें की जी मायबाप ॥ ६ ॥
यानें लग्नांत करणी केली मोठी । माझे बापासी काळी ना जुनी लंगोटी । माझे आईस नाडीयाची आटी । मग कैंची की जी मायबाप ॥ ७ ॥
बहु रेलचेल याच्या बोलाची । डेंगुमेंगु दक्षणा कैंची । पहा गोष्टी करितो उंची । लुच्यावानी की जी मायबाप ॥ ८ ॥
लग्न करुनी घरासी आणिले । घर पाहून बहुत संतोष झाले । चहुंकडून वारा भराभर चाले । ऐसे देखिलें की० ॥ ९ ॥
याचे घरांत मनुष्यांची वस्ती भारी । पाहते तंव एकुलती एक म्हातारी । ती नित अन्न अन्न करी । लोकांचे घरीं तुकड्यासाठीं की जी मायबाप ॥ १० ॥
पायलीभर धान्य आणावें जरीं । तीन शेर ठेवावें याच्या पायांवरी । शेरांत दोघींनी कैशा परी । गुजरान करावी की जी मायबाप ॥ ११ ॥
हा तंव शंखाचा शंखपाळ । याच्या घरीं नांदती कडकडीत तिन्ही काळ । याच्या घरींपैशाचा दुष्काळ । मग तेलामिठाचा विचार कैसा होईल की जी मायबाप ॥ १२ ॥
कपाळ माझें कैसें फुटलें । तक्र पिऊन शरीर पुष्ट झालें । शिस्न पेलूं सारखें चाळलें । संततीचें मूळ खुंटले की जी मायबाप ॥ १३ ॥
ऐसें बोलतां राग आला असेल मनीं । पहा कैसा दिसतो सूर्यसुत दंडपाणी । पाहतो जैसा वक्र शनी । षण्मासींचा की जी मायबाप ॥ १४ ॥
आतां असो हा संवाद । याचा आमचा जन्मोजन्मींचा संमंद । संत-सभेसी केलाविनोद । सहज रीतीनें की जी मायबाप ॥ १५ ॥
एका जनार्दनीं जोहार । रात्र सरली सोंगें आहेत फार । संतांसीं दंडवत वारंवार । मी करतें की जी मायबाप । १६ ॥