मिरी 101
एका मंगल दिवशी मिरी नि मुरारी यांचा विवाह लागला. कृष्णचंद्रांनी मोठा सोहळा केला. मुरारीच्या धन्याने त्याला मोठा आहेर दिला. राहायला एक बंगला दिला. आणि ती लठ्ठ बाई ! ती लग्नाला आली होती. तिने मिरीला मोत्यांचा हार दिला आणि म्हणाली, 'मुरारी, मी मेल्यावर माझे सारे तुझेच होणार आहे. सदुपयोग कर. जगाच्या उपयोगी पड. दोघे सुखी व्हा. जगाला सुखी करा.'
मिरी नि मुरारी बंगल्यात राहायला गेली. सारे सामान तेथे आले. पिंजराही आला. कृपाकाकांची ती खुर्ची, तो कंदील, सारे आले. प्रेमाच्या आठवणी ! त्या दिवशी रात्री मिरी नि मुरारी बाहेर अंगणात उभी होती. आकाशात तारे चमचम करीत होते.
'मिरी, हल्ली हे म्युनिसिपालिटीचे गॅसचे दिवे आहेत. पुढे विजेचे होतील. कृपाकाकांच्या वेळेस असे नव्हते. नाही का ? काळ बदलत आहे.'
'परंतु हृदये तीच. भावना त्याच. प्रेम तेच. कृपाकाकांनी जो प्रकाश जगाला, मला दिला, तो अनंत आहे. त्यांची सर कशाला तरी येईल का ?'
'नाही येणार, स्वर्गातून प्रेमाचा अभंग कंदील ते या विश्वाला दाखवीतच आहेत.'
मिरी नि मुरारी यांचे असे मंगल बोलणे चालले होते आणि तिकडे एका बंगल्याच्या गच्चीवर सुमित्रा नि शांताराम दोघे बसली होती. हातात हात घेऊन बसली होती. मुकी होती. शेवटी शांताराम म्हणाला,
'सुमित्रा, तू एकटी, मीही एकटा, आपण एकत्र राहू. पति- पत्नी होऊ. शेवटची वर्षे तरी एकत्र राहू. मला नाही म्हणू नकोस.'
'शांताराम, सुमित्रेचे दिवस आता फार नाहीत.'
'जे दोन असतील ते तरी एकमेकांची होऊन राहू. आपण एकमेकांची होतो. तारुण्यात आपली हृदये एकरूप होती. आज इतक्या वर्षानंतरही ती तशीच आहेत.'
'मी अशी अशक्त.'
'तुझ्या तोंडावर टवटवी येईल. सुमित्रा, मला नाही म्हणू नकोस. दैवाने इतकी वर्षे आपणां अलग ठेवले. आज प्रभूने एकत्र आणिले आहे. त्याची इच्छा पूर्ण करू. ये.'
'शांताराम, जशी तुझी इच्छा. तुझे घर ते मी माझे करीन.'
आणि एका रम्य ठिकाणी त्यांनी सुंदरशी झोपडी बांधली. आजूबाजूला आमराई होती. त्यांनी फुले फुलविली. पक्षी तेथे किलबिल करीत. सुमित्रा नि शांताराम तेथे शांत आनंद अनुभवीत होती.
एके दिवशी म्हातारी स्वयंपाकीणबाई सुमित्राकडे आली नि म्हणाली, 'मी तुमच्याकडेच राहते.'
'नको आजीबाई. आपण सारीच जर दूर गेलो तर बाबांना कोण बरे ? मी येत जाईन. मिरी, मुरारी येत जातील, तुम्ही तिकडेच राहा.' सुमित्रेने समजावले.
आणि ती आजीबाई पुन्हा कृष्णचंद्रांकडे राहायला गेली. सारी सुखी झाली. प्रेमालाही पुढे अनुरूप वर मिळाला. मिरी-मुरारींनीच तिचे लग्न जमवून आणले. मिरी नि मुरारी, सुमित्रा नि शांताराम यांच्या हृदयात देवाचा प्रकाश आहे, बाहेरचे सूर्यचंद्र मावळतील; परंतु हृदयांतील श्रध्देचा सूर्य, श्रध्देचा चंद्रमा कधी मावळत नसतो. तो परमेश्वरी प्रकाश सदैव आहे. तो प्रकाश ज्याला मिळाला तो धन्य होय. तो प्रकाश ज्याला मिळाला तो खरा डोळस; तो प्रकाश ज्याला नाही तो आंधळा.