मिरी 8
मिरी अंथरुणात होती. जवळ एक बाई काहीतरी शिवीत होती. तिची मुद्रा चिंतातूर होती. मधूनमधून ती मिरीकडे पाहात असे. तिच्या अंगाला हात लावून बघत असे. पुन्हा शिवीत बसे. काही वेळाने मिरीने डोळे उघडले. ती पाहात होती. डोळे मिटी; पुन्हा ते उघडून बघे. तिचे ते टपोरे डोळे ! तापातही ते तेजस्वी दिसत होते.
'काय हवे बाळ ? थोडे दूध देऊ का ?'
'हं.'
'थांब हो, कोमट करुन आणते.'
ती बाई आत गेली. एका वाटीत ती काही तरी घेऊन आली.
'कर आ. मी चमच्याने घालते.'
'काय आहे हे ?'
'आरारुटची लापशी. डॉक्टरांनी ही लापशी द्यायला सांगितले आहे.'
'द्या.'
चमचा चमचा करून तिने ती लापशी घेतली.
'पुरे आता.'
'बरे, मग देईन थोडया वेळाने, पडून राहा.'
त्या बाईने मिरीचे तोंड पुसले. तिच्या अंगावर तिने नीट पांघरूण घातले आणि ती पुन्हा शिवीत बसली.'
'तुम्ही कोण ? कृपाकाका कुठे आहेत ?'
'ते बाहेर गेले आहेत. तुझ्याजवळ बसायला त्यांनी मला सांगितले आहे.'
'तुम्ही शेजारी राहता ?'
'हो. कृपाकाकांचा नि आमचा घरोबा आहे. कृपाकाकांवर सर्वांचे प्रेम. कारण ते नेहमी सर्वांच्या उपयोगी पडतात. त्यांना जगाचा संसार. स्वत:चा संसार आहे कुठे त्यांना ? आम्ही त्यांना देवमाणूस म्हणतो.
'तुम्हीसुध्दा एकटयाच आहात ?'
'मी एकटी नाही. माझा मुलगा आहे. माझे वडील माझ्याजवळच राहतात. आम्ही तिघे आहोत.'
'तुमच्या मुलाचे नाव काय ?'
'मुरारी.'
'मुरारी. केवढा आहे तो ?'
'आहे चौदा-पंधरा वर्षांचा. तू बोलू नकोस बाळ. दमशील. पडून राहा.'