मिरी 50
'बरे तर.'
यशोदाआई बाहेरच उभ्या होत्या. झोपडीत मिणमिण दिवा होता. 'कुठे गेला होता बाबा ? किती धुंडाळायचे तरी ?'
'मी मुरारीला धुंडाळायला गेलो होतो. उंच खडकावर बसून बघत होतो. दिसेना. हा समुद्र आड येतो, त्याच्या लाटांवर मी माझ्या मुठी उगारीत होतो.'
'आणि हे कोण ?'
'मी डॉक्टर. ओळखलेत का ?'
'हो. कृपाकाकांच्या आजारात आणि या मिरीच्या लहानपणाच्या आजारात तुम्ही आला होता. किती दोन वर्षे झाली ? मुरारीला जाऊनच आता तीन वर्षे होऊन गेली. दोन वर्षांनी येईल.'
'तुम्हीही अलीकडे वाळल्यात जरा. काही होते की काय ? मिरी एकटी येत होती यांना घेऊन. म्हटले पुन्हा निसटले हातून तर ? म्हणून घरापर्यंत आलो. तुम्हीही काही औषध घ्या. आलोच आहे. जरा तपासू का ? चला आत.'
म्हातारे बाबा त्यांच्या आरामखुर्चीत बसले. मुरारीने केलेली ती आरामखुर्ची होती. डॉक्टरांनी यशोदाआईंना तपासले.
'तुम्हाला विश्रांती हवी आहे. मी एक औषध पाठवीन ते घेत जा.'
'फार किंमतीचे नाही ना ?'
'मुरारी आल्यावर पैसे घेईन. तोवर नकोत.'
'तो का लवकर येईल, डॉक्टर ?'
'दोन वर्षांनी तर येणार. दिवस भराभर जात असतात. बसा. मी जातो.'
डॉक्टर गेले. मिरीने आग्रह करकरुन म्हातामला चार घास भरवले. 'हा मुरारीचा घास, हा या मिरीचा घास.' असे म्हणून ती देत होती.
'मुरारीच्या तान्या बाळाचाही एक देऊन ठेव.' म्हातारा हसत म्हणाला.
'हा घ्या !'
मिरी, यशोदाआईही आता जेवल्या.