मिरी 20
'मुद्दाम नसेल फेकले; परंतु फेकले काय म्हणून ?'
'ती पडली नि तू तिला हसलीस म्हणून तिला राग आला. आणि आत्याबाई, समजा, दुष्ट असली म्हणून आपणही दुष्ट व्हायचे का ? आपण का दगड मारायचा ? ती एक दुष्ट आणि तूही दुष्ट होणार का ? मग दोन दुष्ट माणसे झाली. जगात चांगली अधिक होऊ देत. दुष्ट कशाला ? खरे ना बाळ ? तुला मुरारी धडे देतो ना ?'
'हो. मुरारी मला फार आवडतो. चित्रे काढतो, गोड बोलतो. परंतु मी दगड फेकल्याचे सांगितले तेव्हा त्याने मला थप्पडही मारली. मी रागावले. मागाहून म्हणाला, रागवू नकोस, मिरे.'
'मुरारी चांगला मुलगा आहे. आईवर त्याचे फार प्रेम आहे. आईचीही सारी भिस्त त्याच्यावर आहे.'
'मुरारी आता शिकणे सोडणार नि नोकरी करणार !'
'इतक्यात नोकरी ?'
'आईला मी आता मदत केली पाहिजे असे तो म्हणतो. आईने किती कष्ट काढावे, खस्ता खाव्या, असे त्याला वाटते. आईला श्रमवून शिकत बसणे म्हणजे चैन आहे असे तो कृपाकाकांजवळ म्हणाला.'
'खरे आहे त्याचे म्हणणे.'
इतक्यात कोणी तरी तेथे आले. मिरी चपापली.
'सुमित्रा, तुला बोलायला भेटली वाटते मिरी ?'
'हो. किती छान बोलते !'
'माझे नाव तुम्हांला काय माहीत ?'
'तू आजारी होतीस तेव्हा आलो होतो मी पहायला. डॉक्टर घेऊन आलो होतो. या सुमित्राचे सारखे सांगणे की डॉक्टर घेऊन जा. तिला गरम बंडीसाठी कापड द्या.'
'त्या गरम बंडीचे कापड तुम्ही दिलेत ?'
'हो.'
'अय्या ! मला माहीतच नाही. तुम्ही कशाला दिलेत ?'
'कृपाकाका एका अनाथ मुलीचे मायबाप बनतात. आम्ही इतकेही करू नये का ? गरिबांची हृदये सोन्यासारखी असावीत आणि श्रीमंतांची का दगडाची असावीत ? तुला घरी आणल्याचे कृपाकाकांनी जेव्हा मला सांगितले, तेव्हा माझे हृदय भरून आले होते. मी त्यांना म्हटले, मिरीला वाढवा. काळजी करू नका. आम्हीही मदत करू. मिरे, आम्हीही तुझेच आहोत. हे माझे बाबा, बरे का ! येत जा आमच्याकडे.'