मिरी 52
मिरीने ते पत्र कितीदा वाचले आणि मग मुरारीचे पत्र तिने वाचावयास घेतले.
'प्रिय मिरीस,
मोठे पत्र लिहायला घेतले, परंतु मी गोंधळून गेलो आहे. लिहू तरी काय ? जे जे लिहीन ते तुला आधीच माहीत असणार. आपण का दोन आहोत ? एकरूप झालेले दोन जीव एकमेकांस नेहमी लिहिणार तरी काय ? म्हणून बर्याच दिवसांत मी पत्र लिहिले नाही. मिरी काय माझ्यापासून लांब आहे पत्र पाठवायला, असे मनात येऊन मी दौत-टाक पुन्हा ठेवून देत असे.
आज एक गृहस्थ हिंदुस्थानात यायला निघाले. ते आपल्या तिकडचे आहेत. त्यांच्याबरोबर तुझ्यासाठी एक पक्षी नि एक शाल पाठवीत आहे. आजोबांसाठी एक छोटा गालीचा देत आहे. आणि आईसाठी एक सुरेखशी गरम बंडी. आईला ती अंगात घालायला सांगत जा. आई बरी आहे ना ? आजोबांना माझी फार आठवण येते. होय ना ? मी आता लवकरच येईन. तीन वर्षे तर गेली. दोन राहिली. हां हां म्हणता जातील. आनंदाने सारी राहा. सर्वांची तू काळजी घे.
मी बरा आहे. तुझे एक स्मृतिचित्र मी काढले होते. एका युरोपियन माणसाला ते फार आवडते. तो माझ्याजवळ ते सारखे मागत होता. शेवटी ते त्याला मी दिले. मी तुझी चित्रे वाटेल तितकी काढीन आणि प्रत्येक वेळचे मागच्या वेळेपेक्षा सरसच येईल. नाही ? पाखराच्या पिंजर्याजवळ मिरी बसली आहे असे एक चित्र काढणार आहे तुला फोटोग्राफी शिकायची आहे तर शीक ना ! मी येईपर्यंत वाट कशाला बघतेस ? मीच तुला शिकवली पाहिजे, हा काय तुझा हट्ट ? तू आधी शीक नि आईचा, आजोबांचा फोटो मला पाठव. सुमित्राताईंचाही पाठव.
तू आता मास्तरीण झालीस. कृपाकाकांची फार इच्छा होती. ते म्हणायचे, 'मी साधे दिवे लावतो. साधा प्रकाश देतो. मिरी ज्ञानाचा प्रकाश देईल. ती शिकेल. मुलांना शिकवील. ती मास्तरीण होईल. प्रोफेसरीण होईल.' मिरे, पत्र लिहिला लिहिता मला हसू येत आहे. प्रोफेसराच्या पत्नीलाही प्रोफेसरीणबाई म्हणतात, वकिलाच्या बायकोस वकिलीणबाई म्हणतात. परंतु बायको प्रोफेसर झाली तर तिच्या प्रोफेसर नसणार्या नवर्याला काय ग म्हणायचे ? नवर्याच्या पदवीवरुन बायकोला पदवी देतात. परंतु बायकोच्या पदवीवरुन नवर्याला का मिळू नये ? जेथे जेथे पुरुषांचाच वरचष्मा. नाही का ? मी व्यापारी. तू शेवटी व्यापारीणबाई होणार का ?
मिरे, तुला माझी आठवण येते ? आता माझी आठवण आली की पिंजर्याजवळ जात जा. पाखराच्या तोंडात डाळिंबाचे दाणे देत जा. ते मला मिळतील. ते पाखरू तुला हाक मारील. त्या मीच मारीत आहे असे समज.
किती लिहू नि काय लिहू ? लिहीन तेवढे थोडेच. लवकरच आपण भेटू. सारी सुखी होऊ. आईला, आजोबांना धीर देत जा. माझे पत्र न आले तरी तुझी येऊ देत. मी परमुलखात आहे हे ध्यानात धर.'
तुझा-
मुरारी