मिरी 88
'ते जातात. तसेच हेही जावोत, तू मला श्रध्दा शिकवलीस. तू माझे हृदय हलके केलेस. तुझी ती श्रध्दा गमावू नकोस.'
त्याने आपल्या पिशवीतून फळे काढली.
'मिरे, ही घे द्राक्षे. ही सुमित्राताईंना दे. डॉक्टर कोठे आहेत ? बोटीतही ते रोगी तपाशीत असतील. कमाल आहे त्यांची !'
असे ते म्हणत आहेत तोच डॉक्टर आले.
'या डॉक्टर. फलाहार करा.'
'वा: ! त्या मिरीला द्या. काल नीट जेवलीही नाही. खूप खावे, प्यावे, हसावे, आनंदाने राहावे.'
'डॉक्टर, तुम्ही किती खाता ?' मिरीने विचारले.
'शरीर बघ. पोटभर खाल्ल्याशिवाय असा आहे का धष्टपुष्ठ ? हं, खा ती द्राक्षे. सफरचंद फोड !'
फलाहार झाला. तो पाहुणा गेला बोटीत हिंडायला. सुमित्रा जरा पडली. मिरी समुद्राच्या लाटांकडे बघत होती.
दिवस मावळला. आता हळूहळू अंधार पडू लागला. बोटीतले दिवे लागले. वारा जरा जोरात सुटला होता. बोट हलत होती.
'मिरे, जरा पड तूही.' डॉक्टर म्हणाले.
सारी मंडळी झोपली, परंतु एक दोन तासांनी एकाएकी सारी मंडळी जागी झाली. बोटीत हलकल्लोळ माजला. बोटीला आग लागली होती. कप्तानही घाबरला. त्याने किनार्याकडे बोट वळविली. परंतु शेवटी आग फारच भडकली ! आता काय करावयाचे ?
तो अपरिचित मनुष्य मिरीकडे आला. डॉक्टर तेथे सचिंतपणे उभे होते.
'मिरे, मी तुला घेऊन जातो. मी समुद्रात उतरतो, तू या दोरीला धरून खाली ये. मी तुला धरून तीराला पोहत जाईन.' तो म्हणाला.