मिरी 89
'आधी सुमित्राताईंना न्या. मग मी. चर्चा नको, त्यांनाच आधी न्या.'
'बरे तर, सुमित्राताईंना घेऊन जातो.' त्याने तयारी केली.
'मिरे, तू तेथेच उभी राहा हं ! ही खूण. मी परत येईन. हाका मारीन. तू निमूटपणे खाली ये. खाली ये. चला सुमित्राताई.'
त्याने पाण्यात उडी घेतली. सुमित्राताईंना पाण्यात सोडण्यात आले. त्यांना पकडले. लाटांशी झुंजत आपला अमूल्य ठेवा घेऊन तो जात होता. इतक्यात मिरीजवळ ती तरुणी आक्रोश करीत आली.
'काय करायचे हो ? ते वाट बघतील, अरेरे !' असे ती म्हणत होती. रडत होती. मिरीने क्षणभर तिच्याकडे मत्सराने पाहिले. परंतु क्षणभरच. तिने मनात विचार केला. तिच्यासमोर मुरारी उभा राहिला. 'मुरारीची मर्जी. त्याचे सुख.' असे ती म्हणाली.
'ओरडू नका. येथे उभ्या राहा. या ज्वाला लागतील. तोंडावर हा पातळ बुरखा घ्या. आता एक गृहस्थ येथे खाली येतील. ते हाका मारतील. तुम्ही निमूटपणे उतरायचे. समजले ना ?'
डॉक्टर पलीकडे उभे होते.
'डॉक्टर, काय करणार ?'
'तू काय करणार ?'
'ते कदाचित आम्हांला वाचवतील.'
'तिसरी खेप अशक्य दिसते. बोट लवकरच कोलमडणार असे दिसत आहे.'
'तुम्ही उडी घ्या. येथे राहणे धोक्याचे.'
'तू म्हणतेस तसेच करतो. जगलो-वाचलो तर आपण पुन्हा भेटू. मिरे, प्रभूची इच्छा !' असे म्हणून ते डॉक्टर गेले.
मिरी नि ती तरुणी दोघी तेथे उभ्या होत्या. तो पाहा, तो अपरिचित पाहुणा येत आहे. अंतर कापीत झपाटयाने येत आहे.
'खाली ये लवकर, लवकर.' तो ओरडला.
'उतरा, या दोरीवरून. तोंडावर बुरखा असू दे.' मिरी त्या तरुणीला म्हणाली.
ती तरुणी उतरली. मिरी बघत होती. इतक्यात ती बोट कलंडली. एकच आकांत झाला. थोडया वेळाने सारे शांत झाले. मिरीचे काय झाले ? शेवटी ती का देवाघरी गेली ? मुरारीचे स्वप्न हृदयाशी धरून ती जगातूनं गेली ? प्रभूला माहीत.