मिरी 53
'मिरे, खुशाल आहे ना मुरारी ?' यशोदाबाईंनी विचारले.
'खुशाल आहे. मी मग सारे वाचून दाखवीन आणि गरम बंडी घालीत जा म्हणून तुम्हांला त्याने लिहिले आहे. आजोबा, गालीचा आवडला का ?' मिरीने आजोबांजवळ जाऊन प्रश्न केला.
'गालीचा चांगला आहे. परंतु पाठवणारा कधी येणार ? हा गालीचा गुंडाळून नीट ठेव. मुरारी येईल त्या दिवशी मी त्यावर बसेन.' आजोबा म्हणाले.
दिवस जात होते. मिरी त्या पाखराला कधी विसंबत नसे. ते आता चांगले बोले. शीळ घाली. 'मुरारी मुरारी, ये ये' असे म्हणे आणि ते शब्द ऐकून मिरी टाळया वाजवी, नाचे. तो लहानसा पिंजरा म्हणजे त्या सर्वांचे सुखधाम होते. कधी कधी त्या पक्ष्याला ती बाहेर काढी आणि हृदयाशी धरी. आपल्या पदराखाली लपवी.
'जा आफ्रिकेत. घेऊन ये मुरारीला. जातोस ?' असे ती त्याला म्हणे. त्याला रोज ताजी फळे देई, ताजे पाणी देई. त्याचा पिंजरा आधी साफ करी. शाळेत जाताना क्षणभर पिंजर्याजवळ उभी राही. आणि भावनांनी ओथंबून मग ती जाई.
एके दिवशी ती शाळेतून येत होती. आजोबांसाठी सुंदर फुलांचा सुगंधी गुच्छ घेऊन ती येत होती. ती घराजवळ, त्या झोपडीजवळ आली तो यशोदाबाई रडत होत्या. आजोबा घोंगडीवर होते. ते का झोपले होते ?
'मिरे, आधी डॉक्टरांकडे जा. तुझे आजोबा, मुरारीचे आजोबा हालचाल करीत नाहीत; बोलत नाहीत. जा.' यशोदाबाई म्हणाल्या.
तेथे अंथरुणाजवळ फुले ठेवून मिरी गेली. पिंजर्यातील पाखरू आज नाचले नाही. 'मिरी, मिरी' त्याने हाक मारली नाही. ते स्तब्ध होते. पिंजर्यातील दाणे तसेच होते, फळांच्या फोडी तशाच होत्या. आज का त्याला उपवास होता ? का त्याला पुढचे दिसत होते ? उडून जाणार्या प्राणहंसाचे त्याला अंधुक दर्शन का होत होते ? कधीकधी मानवांना कळत नाही ते मानवेतर प्राण्यांना कळते असे म्हणतात. खरे का ते ?
मिरी नि डॉक्टर, दोघे एका घोडयाच्या गाडीतून येत होती. बोलत येत होती.
'डॉक्टर, आता तुम्ही एक मोटर घ्या. रोग्याकडे पटकन येता येईल.'
'पैसे शिल्लक पडले म्हणजे घेईन. अद्याप आपल्या गावात मोटारींचा सुळसुळाट फार झाला नाही, ते बरे. रस्ते बिनधुळीचे होण्याआधी मोटारी घेणे म्हणजे पाप. धुळीचे लोट उडतात, रोग वाढतात. मी जर आरोग्यमंत्री झालो तर पहिल्याने कायदा करीन की धुळीच्या रस्त्याने मोटारी जायला बंदी आहे.'