Get it on Google Play
Download on the App Store

मिरी 43

'म्हणजे यशोदाआईंना भार वाटणार नाही. मी त्यांना म्हटले की मला नोकरी मिळत आहे. कोठे तरी राहायचे तर तुमच्याकडे राहीन. त्यांना ते बरे वाटले. सुमित्राताई, जाऊ का मी ? तुम्ही मार्ग दाखवा आपण लंकेला जायची तयारी केली आहे. बाबा काय म्हणतील ? ते रागावतील. मी बरोबर नसेन तर तुमचे कसे होईल ? गडीमाणसे बरोबर घेतली तरी तुमचे सुखदु:ख त्यांना तुम्ही थोडेच सांगाल ? मी तुमचा स्वभाव जाणते. तुम्ही मला कृतघ्न म्हणाल का ? काय करू मी ? परंतु मुरारी जाताना मला म्हणाला, 'मिरे, आजोबांची, आईची काळजी घे. तुझ्यावर विश्वासून मी जात आहे.' सुमित्राताई, कृपाकाकांनी मला आधार दिला. यशोदाआई, मुरारी यांनीही किती प्रेम दिले ! माझ्या आजारीपणात कृपाकाकांना त्यांची मदत होई. अनेकांच्या प्रेमावर मिरीची जीवनवेल पोसली आहे. काय करू सांगा.'

'मिरे, बाबांना वाईट वाटेल. त्यांच्या इच्छेविरुध्द झालेले त्यांना खपत नसते. एरवी ते प्रेमळ आहेत. परंतु रागावले तर जमदग्नी होतात. आणि माझ्या सुखाच्या आड कोणी आले तर ते त्याला खाऊ की गिळू करतील. परंतु मी त्यांची समजूत घालीन. तू जा. मी आजपर्यंत तुला कर्तव्याचे धडे शिकवीत आले. आज मी स्वार्थी का होऊ ? माझ्या आसक्तीत तुला गुंतवू ! मला बरे वाटत आहे. तू जा. मुरारीच्या घरी जा. जेथे अधिक जरूरी तेथे आधी गेले पाहिजे. मिरे, वाईट वाटून नको घेऊस. आनंदाने तुला सांगत आहे.'

इतक्यात कृष्णचंद्र बाहेर गेले होते ते आले. ते म्हणाले.

'काय सांगत आहेस ? प्रवासाची सुखस्वप्ने, होय ना ? सीतेचे अशोकवन बघायला चला. सुंदर लंका बघायला चला. भारतमातेच्या पायांवर मोत्यांच्या राशी भक्तिप्रेमाने ओतणारा कन्याकुमारीजवळचा तो गंभीर समुद्र बघायला चला. सिलोनचे सुंदर द्वीपकल्प म्हणजे भारतमातेच्या पायांशी बसलेले गोड लहान बाळ असे मला वाटत असते. जायचे ना मिरे ? सुमित्रा आंधळी नसती, तर तिने रमणीय स्थळांचे फोटोही काढले असते. मिरे तू का नाही शिकत फोटोग्राफी ?'

'मुरारी आला की शिकवील. तो आफ्रिकेत शिकला आहे. तो चित्रेही सुंदर काढतो. मुरारी कलावान आहे.'

'आणि मिरी ?'

'मिरी मोलकरीण आहे. बाबा, तुम्हांला एक गोष्ट सांगायची आहे.'

'कोणती ?'

'मी लंकेच्या प्रवासाला येऊ शकत नाही.'

'म्हणजे, थट्टा करतेस की काय ?'

'थट्टा नाही. गंभीरपणानेच मी सांगत आहे. मुरारीच्या घरी राहायला मी जाणार आहे. त्याच्या आजोबांचे लक्षण ठीक नाही. यशोदाबाई सचिंत आहेत. माझी त्यांना जरुरी आहे. मुरारीला मी वचन दिले आहे की, मी त्यांची काळजी घेईन. तो सातासमुद्रांपलीकडे. येथे मीच त्यांना आहे. मला जाऊ द्या. क्षमा करा. माझे कर्तव्य मला बोलवीत आहे.

'तू नाही येणार आमच्याबरोबर ?'

'नाही. येऊ शकत नाही.'

'तू आलेच पाहिजेस.'

'बाबा, मिरीला जाऊ दे. ते तिचे पहिले कर्तव्य आहे.'


मिरी

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
मिरी 1 मिरी 2 मिरी 3 मिरी 4 मिरी 5 मिरी 6 मिरी 7 मिरी 8 मिरी 9 मिरी 10 मिरी 11 मिरी 12 मिरी 13 मिरी 14 मिरी 15 मिरी 16 मिरी 17 मिरी 18 मिरी 19 मिरी 20 मिरी 21 मिरी 22 मिरी 23 मिरी 24 मिरी 25 मिरी 26 मिरी 27 मिरी 28 मिरी 29 मिरी 30 मिरी 31 मिरी 32 मिरी 33 मिरी 34 मिरी 35 मिरी 36 मिरी 37 मिरी 38 मिरी 39 मिरी 40 मिरी 41 मिरी 42 मिरी 43 मिरी 44 मिरी 45 मिरी 46 मिरी 47 मिरी 48 मिरी 49 मिरी 50 मिरी 51 मिरी 52 मिरी 53 मिरी 54 मिरी 55 मिरी 56 मिरी 57 मिरी 58 मिरी 59 मिरी 60 मिरी 61 मिरी 62 मिरी 63 मिरी 64 मिरी 65 मिरी 66 मिरी 67 मिरी 68 मिरी 69 मिरी 70 मिरी 71 मिरी 72 मिरी 73 मिरी 74 मिरी 75 मिरी 76 मिरी 77 मिरी 78 मिरी 79 मिरी 80 मिरी 81 मिरी 82 मिरी 83 मिरी 84 मिरी 85 मिरी 86 मिरी 87 मिरी 88 मिरी 89 मिरी 90 मिरी 91 मिरी 92 मिरी 93 मिरी 94 मिरी 95 मिरी 96 मिरी 97 मिरी 98 मिरी 99 मिरी 100 मिरी 101