मिरी 30
'तुझी आई तुला जाऊ देणार नाही.'
'आईला न सांगताच जावे असे वाटते.'
'असे नको करुस मुरारी. आईसाठी तर सारे करायचे आणि तिला का दु:खात ठेवून जायचे ? तुझी आठवण काढून ती माऊली रडत बसेल. नोकरी सुटली तर दुसरी मिळेल.'
'अग पंचवीस एके पंचवीस. आपणास पुढे यायला हे लोक वाव देत नाहीत. दिवसभर नुसती हमाली करायची. नवीन ज्ञान घेऊ देत नाहीत. सारे अप्पलपोटे.'
'नवीन चांगली नोकरी मिळेपर्यंत तू शीक, अभ्यास कर. मागे म्हणत असायचास की उर्दूचा अभ्यास करीन. फ्रेंच शिकेन. शीक शिकता येईल तेवढे.'
'मॅट्रिक तर नाही होता आले.'
'घरी शीक. सुमित्राबाईचे वडील पुस्तके देतील. असा निराश नको होऊस मुरारी. कोठे जाऊ नकोस.'
ती दोघे बोलत जात होती. इतक्यात एक लठ्ठ बाई रस्त्यात पाय घसरून पडली. तिच्या हातातले सामान पडले. लोक हसत होते. फिरायला जाणार्या ऐटबाज पोशाखी मुली त्या लठ्ठ बाईची फजिती पाहून हसत होत्या. परंतु मुरारी तिथे धावून गेला. त्याने त्या बाईला आधार दिला. त्याने तिचे सामान गोळा करुन दिले.
'लागले की काय ?' त्याने विचारले.
'होय, बाळ. माझा हात धरुन नेशील का माझ्या घरी ? पलीकडच्या रस्त्याला माझा बंगला आहे.'
'मिरे, मी यांना पोहचवायला जातो. तू घरी जा. मी यांना पोचवून येतो.'
मिरी गेली. त्या लठ्ठ बाईचा हात धरून मुरारी जात होता. येणारे-जाणारे कौतुकाने, विस्मयाने पाहात होते. तरुण-तरुणी मिस्किलपणे हसत होती. मुरारी उंच होता. तेजस्वी नि सुंदर दिसत होता. परंतु मुरारीला त्याची लाज वाटत नव्हती. तो शांतपणे जात होता. एका सुंदर तरुणाची आपल्याला मदत मिळाली म्हणून त्या बाईला जणू अभिमान वाटत होता.
तो बंगला आला.
'मी जाईन आता, बाळ. तुझे नाव काय ?'
'माझे नाव मुरारी.'
'तुझा पत्ता एका कागदावर लिहून दे नि जा.'
त्याने पत्ता लिहून दिला. नमस्कार करून तो गेला. तो घरी आला. मिरी हसत होती. त्या बाईची हकीगत सांगत होती.
'या प्रियकर !' ती थट्टेने म्हणाली.
'कोणाचा प्रियकर ?'
'जिचा हात हातात घेतला तिचा. केवढी अगडबंब बाई ! मलासुध्दा हसू येणार होते. मुरारी, तुला मी भ्याले.'