Get it on Google Play
Download on the App Store

मिरी 85

'उगी बेटा. रडू नको, पूस डोळे. काय झाले सांग. मुरारी खुशाल आहे ना ? त्याचे काही बरेवाईट कळले ? त्याचे का पत्र आले, निरोप आला ? कोणी व्यापारी का तिकडचा भेटला ? की काही कुणकुण ऐकलीस ? सांग.'

'मुरारीला मी इथे पाहिले.'

'इथे ?'

'हो. येथल्या नंदनवनात पाहिले. आज पाहिले. काल पाहिले. त्या सुंदर तरुणीबरोबर तो प्रेमाने बोलत होता. तुझ्याशिवाय क्षणही करमणार नाही असे म्हणत होता. पुढे मी चोरून ऐकत उभी राहिले नाही. मी निघून आले. सारे शून्य वाटले. त्या व्यापार्‍याने मुरारीला पाठवले होते, त्याचीच ती मुलगी. ज्या मोठया बंगल्यात राहणारी. जरीची पातळे नेसणारी. मी तिला पूर्वी पाहिले होते. मुरारीचे अलिकडे कितीतरी दिवसांत म्हणूनच पत्र नाही. या दरिद्री मिरीला काय म्हणून त्याने पत्र पाठवावे ? तो कशाला माझ्याशी लग्न करील ? मी अनाथ आहे. माझे जगात कोण आहे ? बेवारशी मी मुलगी. आईबापांचा पत्ता नाही. बहीण ना भाऊ. पोरकी अनाथ अशी मी पोर. सुमित्राताई, तुमची मिरी दुर्दैवी आहे. कपाळकरंटी आहे. या समोरच्या अथांग सागरात मला उडी घेऊ दे. संपवू दे हे जीवन. ज्याच्या आशेवर कित्येक दिवस राहिले, त्यानेही दूर लोटले. गेली पाच-सहा वर्षे त्याचे मी नित्य स्मरण करीत असे. त्याच्यासाठी मी प्रार्थना करीत असते. त्याच्या नावाने पाण्याचा घोट पिते. घास घेते. अरेरे ! असे कसे हे जग ! सुमित्राताई, आता कशी जगू ? कशासाठी जगू !'

मिरी रडू लागली. थोडया वेळाने सुमित्राताई म्हणाल्या.

'मिरे, जशी मी जगत आले तशी तूही जग.'

'तुम्हांला या वेदना नाहीत म्हणून तुम्ही जगत आहात. या असह्य वेदना असतात. हृदय जाळणार्‍या वेदना ! पाच वर्षे त्याची मनात मी प्रेमपूजा करीत होते. त्याच्या आधीही त्याच्याविषयीचे प्रेम मनात वाढत होते. जणू त्याची होऊनच मी राहिले होते. त्याची होऊनच त्याच्या आजोबांची, त्याच्या आईची सेवा केली. सुमित्राताई, जीवनाचे मूळच तुटले असे वाटते. तुम्हांला माझ्या दु:खाची तीव्रता कशी कळणार !'

'मिरे, मागे एकदा मी तुला म्हटले होते की, प्रेमाच्या दिव्यातून मीही गेले आहे. आठवतात ते माझे शब्द ? आज ऐक. या आंधळीची करुण कहाणी ऐक. पाच वर्षेच काय, आज पंचवीस वर्षे या हृदयात त्या प्रेमाग्नीच्या वेदना मी अनुभवीत आहे. अश्रूंनी माझ्या प्रेमदेवाची मी आज दोन तपांहून अधिक काळ एकांतात हृदयात पूजा करीत आहे. आतल्या डोळयांनी त्याला मी बघते. अंतरंगात त्याला मी ओवाळते आणि त्याची माझी भेट नाही. इतक्या वर्षांत भेट नाही, चिठीचपाटी नाही. निरोप नाही. काही नाही. मी तुम्हांला शांत, समाधानी दिसते. माझ्या तोंडावर मंद हास्य खेळत असते. परंतु आनंद, समाधान, हास्य यांची माझ्या तोंडावर फुलणारी फुले हृदयातील अनंत अश्रूंतूनच उगवत असतात. मिरे, स्वत:चे व्यक्तिगत दु:ख मी स्वत:जवळच आत ठेवते आणि देवाच्या या दुनियेसाठी आनंदी, समाधानी राहते. मी माझ्यातच गुरफटून गेले नाही. केवळ आत्मलक्षी, स्वत:पुरते पाहणारी मी झाले नाही. परंतु म्हणून का मला दु:ख नाही, वेदना नाहीत ? सारे आहे. सारे ताजे आहे. मिरे, माझ्या जीवनाची कथाही अत्यंत करुण आहे. माझी आई एक गरीब विधवा होती. तिने बाबांबरोबर जेव्हा लग्न लावले, तेव्हा तिला पहिल्या लग्नाचा एक लहान मुलगा होता. त्याचे नाव शांताराम ! आमच्या घरात तो वाढत होता. तो चारपाच वर्षांचा असेल, तेव्हा माझा जन्म झाला. आम्ही दूधभाऊ होतो. दोघांचे बाप निराळे, परंतु आई एक होती आणि मी वाढू लागले. शांताराम नि मी खेळत असू. तो माझा खेळ मांडी. मला पतंग करून देई. माझी बाहुली नीट करून देई. तो मला समुद्रावर नेई. माझ्यासाठी तो शिंपल्या, कवडया, गोळा करी. समुद्राच्या लाटांत मला नेई. मी घाबरले तर मला उचलून घेई. अशी आम्ही वाढत होतो.

'शांताराम शाळेत जाई. मोठी झाल्यावर मीही जाऊ लागले. तो इंग्रजी शाळेत जाई. मी मराठी. तो मला पोहोचवून मग आपल्या शाळेत जाई, आम्ही एकमेकांस कधी विसंबत नसू. भांडलो, रुसलो, रागावलो तरी पुन्हा एक होत असू. असे दिवस जात होते.

मिरी

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
मिरी 1 मिरी 2 मिरी 3 मिरी 4 मिरी 5 मिरी 6 मिरी 7 मिरी 8 मिरी 9 मिरी 10 मिरी 11 मिरी 12 मिरी 13 मिरी 14 मिरी 15 मिरी 16 मिरी 17 मिरी 18 मिरी 19 मिरी 20 मिरी 21 मिरी 22 मिरी 23 मिरी 24 मिरी 25 मिरी 26 मिरी 27 मिरी 28 मिरी 29 मिरी 30 मिरी 31 मिरी 32 मिरी 33 मिरी 34 मिरी 35 मिरी 36 मिरी 37 मिरी 38 मिरी 39 मिरी 40 मिरी 41 मिरी 42 मिरी 43 मिरी 44 मिरी 45 मिरी 46 मिरी 47 मिरी 48 मिरी 49 मिरी 50 मिरी 51 मिरी 52 मिरी 53 मिरी 54 मिरी 55 मिरी 56 मिरी 57 मिरी 58 मिरी 59 मिरी 60 मिरी 61 मिरी 62 मिरी 63 मिरी 64 मिरी 65 मिरी 66 मिरी 67 मिरी 68 मिरी 69 मिरी 70 मिरी 71 मिरी 72 मिरी 73 मिरी 74 मिरी 75 मिरी 76 मिरी 77 मिरी 78 मिरी 79 मिरी 80 मिरी 81 मिरी 82 मिरी 83 मिरी 84 मिरी 85 मिरी 86 मिरी 87 मिरी 88 मिरी 89 मिरी 90 मिरी 91 मिरी 92 मिरी 93 मिरी 94 मिरी 95 मिरी 96 मिरी 97 मिरी 98 मिरी 99 मिरी 100 मिरी 101