मिरी 76
'आम्ही कोणीच करीत नाही. आमच्या घरी भरपूर नोकर आहेत. आम्ही कधी केला नाही.' मडी म्हणाली.
'आज तुम्हीच दोघींनी केला पाहिजे. तुम्ही केलात तरच मी पिईन.' कृष्णचंद्र म्हणाले.
'जा बाई दोघी. आणा करून.'
'मिरे, तू चल मदतीला. दुरून दाखव.' मडी म्हणाली.
'ती नको, ती मला वाचून दाखवील.'
'आम्ही वाचून दाखवितो. मिरीच चहाला जाऊ दे.' लडी म्हणाली.
'नको. चहा तुम्हीच करा. वाचून दाखवायचे असेल तर मागून वाचूनही दाखवा. मिरी गप्पा मारीत बसेल.' शेवटी त्या दोघी गेल्या.
कृष्णचंद्र बोलत बसले.
'मिरे, प्रेमा कुठे आहे ?' त्यांनी विचारले.
'मी तिला बोलावते. ती सुमित्राताईजवळ आहे.'
'दोघींना घेऊन ये. सुमित्राची प्रकृती बरी नाही.'
'त्या जेवतच नाहीत नीट' राणीसरकार म्हणाल्या.
'तू तिच्यावर माया करतेस ना ?'
'परंतु त्या मुळी बोलतच नाहीत.'
'तिच्या खोलीत तू मिरीला दवडलेस. तिचे कपडेही धोब्याकडे तू देत नाहीस. आंघोळीला गरम पाणी म्हणे बादलीभरच घेत जा, असे तू फर्माविलेस. खरे ना ! हीच का तुझी माया ? तुझ्या या दूरच्या बहिणी आल्या. त्यांना स्वतंत्र खोल्या नि माझ्या सुमित्राच्या खोलीत मिरीचे बिर्हाड !'
'तुमच्या घरात मिरीची सत्ता की माझी ?'
'हा सत्तेचा प्रश्न नाही. साध्या माणुसकीचा आहे.'
'त्या मिरीजवळ का माणुसकी आहे ? प्रेमाच्या प्रियकराला हिने दवडले. बिचारी प्रेमा रडत असते.'
'मिरीने असे दुष्ट कृत्य केले असते तर प्रेमा तिच्याजवळ बोलली नसती. परंतु प्रेमा तर तिच्याबरोबर अधिक असते. सारी सत्यकथा माझ्या कानावर आली आहे. प्रेमावर प्रेम करण्याचे नाटक करून तो मिरीवर प्रेम करीत होता. हया दोघांचे प्रेम जमावे म्हणून मिरी उलट खटपट करीत होती. प्रेमाला तिनेच वसंतोत्सवात सजवून पाठवले. प्रेमाचा खोटा कैवार घेऊन मिरीला नावे नका ठेवू. ती थोर मनाची मुलगी आहे.
इतक्यात सुमित्राताई, प्रेमा तेथे आल्या.
'सुमित्रा, तू बरी नाहीस ?' कृष्णचंद्र म्हणाले.
'बरी आहे मी बाबा. मनात शांती आहे.'
'तू जातेस का कोठे हवापालट करायला ? मिरीला बरोबर घेऊन जा.'
'बघू, काय घाई आहे ?'
इतक्यात अकस्मात डॉक्टर आले. सारी मंडळी उभी राहिली.'
'या डॉक्टर.' कृष्णचंद्र म्हणाले.
'बसा सारी. सुमित्राताई, तुम्ही नका उठू. बसा.'
'आज अवेळी कोठून आलात ? कामाशिवाय तुम्ही कधी यायचे नाहीत.' कृष्णचंद्र म्हणाले.
'कामासाठीच आलो आहे.'
'मिरी, आणखी एक कप चहा करायला सांग जा.'
'मीच जाते.' राणीसरकार म्हणाल्या.
'सुमित्राताई, तुमची प्रकृती तितकीशी चांगली नाही.' डॉक्टर म्हणाले.
'मी तिला कोठे तरी हवापालट करायला जा, असे सांगतो आहे.' कृष्णचंद्र म्हणाले.
'मी त्याच बाबतीत बोलायला आलो आहे. मीही कोठे तरी जाण्याचा विचार करीत आहे. सुंदर स्थाने पाहून येऊ. कोठे आवडले तर चार दिवस मुक्काम करू. दुसरेही एक गृहस्थ माझ्याबरोबर येणार आहेत.'
'कोण आहेत ते ? मिरीने विचारले.
'त्यांची मलाही नीट माहिती नाही. तत्त्वज्ञानी दिसतो आहे. या गावचा नाही. जगाचा तो यात्रेकरू आहे. बुध्दिमान आहे. सार्या विषयांची त्याला माहिती आहे. चेहरा गंभीर परंतु जरा उदास दिसतो. त्यांची माझी सहज गाठ पडली. ते म्हणाले, 'मीही येतो तुमच्याबरोबर.' मी त्यांना 'या' म्हटले. मग जायचे का ? मिरे, तू हवीसच बरोबर.'