मिरी 13
कृपाकाकांनी बरोबर ब्रेड आणला होता. तोच त्यांनी दुधाबरोबर खाल्ला. मिरी गाढ झोपली होती. तेही आरामखुर्चीत पडले. रात्री मुरारीच्या आईने येऊन विचारले.
'कृपाकाका, रात्री बसू का थोडा वेळ ?'
'आज मिरीला झोप लागेल असे दिसते. आज नको जागरण. जरूर लागली तर हाक मारीन हं !'
'तुम्ही स्वत:च्या प्रकृतीला जपा.'
'सांभाळणारा तो प्रभू.'
सकाळी मिरीला चांगलीच हुशारी वाटली. ताप साफ निघाला होता. सर्वांना आनंद झाला. हळूहळू तिला अधिक बरे वाटू लागले. ती हिंडती-फिरती झाली; हसू-खेळू लागली. शेजारीपाजारी ती जाऊ-येऊ लागली. एके दिवशी मुरारीची आई तिला म्हणाली.
'मिरे, तू आता घरात काम केले पाहिजेस.'
'काय काम करू ? माझ्या लक्षातच येत नाही.'
'तुमची खोली आधी नीट लावली पाहिजे. कृपाकाकांना ते जमत नाही. ती पलीकडे जमनी राहते. तिला आज मी सांगेन. जमनी फार व्यवस्थित. तिची लहानशी खोली आहे, परंतु सारे कसे जागच्या जागी असते.'
'परंतु मी काय करू ?'
'सकाळी जरा लवकर उठावे. कृपाकाकांना सकाळी चहा लागतो. तू तो तयार करावास. शेगडी पेटवावी. आधण ठेवून द्यावे. रात्रीही काम आटोपून ते येण्यापूर्वी भाकरी-पोळी करून ठेवावी.'
'मला नीट करता येत नाही.'
'मी शिकवीन सारे. कृपाकाका दिवे लावून येतील तो घरी जेवण तयार. मिरीच्या हातचे गोड गोड जेवण.'
'तुम्ही मला शिकवा. मी सारे करीत जाईन.'
'भांडी नीट घासून ठेवावी. केर दोनदा काढावा. केरसुणी कोपर्यातून वरून खालून नीट मारावी. खिडकीच्या वरून मारावी. कोळिष्टके असतात. समजलीस ना ? आणि कृपाकाकांचा सदरा साबण लावून धुऊन ठेवीत जा. त्यांना किती आनंद होईल ! तू जणू त्यांची मुलगी. तू त्यांची काळजी घेतजा. त्यांनी तुझी किती काळजी घेतली ? खरे ना ?'