मिरी 14
'आणि शाळेत जाऊ ना मी ?'
'आणखी दोन महिन्यांनी जा. लवकरच आता उन्हाळयाची सुट्टी लागेल. घरी आधी शीक. मुरारी शिकवील. तो तुला धडा देईल. आणि आमच्या नानांबरोबर तू एखाद्या वेळी सोबत म्हणून जात जा. ते कामाला जातात; परंतु म्हातारे झाले आहेत.'
'ते कोणते काम करतात ?'
'ते रंगकाम करतात. सुंदर चित्रे काढतात. एका नवीन देवळात हल्ली ते चित्रे काढण्याचे काम करतात. मुरारीलासुध्दा चित्रे काढायला येतात.'
'मीसुध्दा शिकेन. मग कृपाकाकांच्या खोलीत चित्रे टांगीन. कृपाकाकांचे काढायला हवे एक चित्र. मी मुरारीला सांगेन. त्या चित्राला मग मी फुलांचा हार घालीन. तेथे फुले नाहीत, यशोदाबाई ?'
'मुरारी तुला आणून देईल.'
त्या दिवशी दुपारी जमनी आली. मिरीची खोली नीट लावण्यात आली. सारे सामान आधी बाहेर काढण्यात आले. कपबश्या ठेवायला एक कपाट भिंतीत ठेवण्यात आले.'
'मिरे, आमच्याकडे एक लहानशी पलंगडी आहे ती आणते हं. तुला झोपायला ती होईल. कृपाकाकांची खाट अशी ठेवू, तुझी पलंगडी अशी.'
'छान ! आणि हा आरामखुर्ची ?'
'तेथे बाहेरच्या गॅलरीत राहील. आधी मिटून ठेवावी. लागली तर घालावी. या बाजूला कोळशाचे पोते. कपडे सारे या दोरीवर नीट ठेवीत जा. नाहीतर पेटीत ठेवीत जा. या खोक्याची नीट पेटी होईल.'
जमनीने त्या मोडक्या खोक्याची पेटी केली. ती पेटी तिने खाटेखाली ठेवली. पेटीत कपडे. एक आरसा होता, तो टांगण्यात आला. इतक्यात मुरारी आला.
'वा: ! खोली अगदी सुंदर झाली.'
'मुरारी, येथे चित्रे हवीत दोन, नाही ?'
'मी आणतो हं !'
'मुरारीने ध्रुव-नारायणांचे एक सुंदर चित्र आणले. ते त्याच्या हातचे होते.
'तू काढलेस हे ?'
'हो.'