मिरी 46
सकाळ झाली. सारी उठली. मिरीने फुलांचा गुच्छ सुमित्राताईंच्या खोलीत ठेवला. तिने आपले सामान बांधले. कृपाकाकांचा तो कंदील वगैरे येथे आणलेले नव्हतेच. ते तिकडे शहरातल्या बंगल्यातच होते. तिने सर्वांचा निरोप घेतला. सुमित्राताईंच्या व कृष्णचंद्रांच्या ती पाया पडली. स्वयंपाकीणबाईंनाही तिने प्रणाम केला. अलीकडे त्या आजीबाईंचेही प्रेम तिने मिळविले होते आणि शेवटी इतर गडीमाणसांचा, मोलकरणींचा तिने प्रेमाने निरोप घेतला. त्या मोलकरणीने दोन फुले तिच्या वेणीत घातली. तिच्या डोळयांत अश्रू उभे राहिले.
'मिराबाई, शेवटी तू चाललीस ? तू या घराची शोभा होतीस. या घराचा तू प्राण होतीस, आत्मा होतीस. आता आमच्याशी कोण गोड बोलेल ? प्रेमाने फळाची फोड आमच्यासाठी कोण ठेवील ? भांडी बरीच असली तर घासायला प्रेमाने मदत करायला कोण येईल ? मिराबाई, सुखी राहा. तू देवमाणूस आहेस.' त्या मोलकरणीच्या तोंडातून श्रृतिस्मृती बाहेर पडत होत्या.
गडयाने गाडी जुंपली. मिरीची ट्रंक, वळकटी ठेवण्यात आली. बैल निघाले. अंगणात स्तब्धपणे, कठोरपणे कृष्णचंद्र उभे होते. इतर गडीमाणसे, मोलकरणी रस्त्यावर 'ये हो, ये हो' करीत प्रेमाने गेली. सुमित्राताई आपल्या खोलीतील खिडकीजवळ उभ्या होत्या. दुरून येणारा घंटांचा आवाज ऐकत होत्या.
'गेली मिरी. कर्तव्य करायला गेली. कर्तव्य कठोरच असते. कर्तव्याचा मार्ग कठीणच आहे.' असे म्हणून त्या आपल्या पलंगडीवर पडल्या.
'कृतघ्न आहे तुझी मिरी.' कृष्णचंद्र वर येऊन क्रोधाने म्हणाले.
'तिच्यासारखी गुणी मुलगी त्रिभुवनात सापडणार नाही. मिरी म्हणजे बाबा, एक रत्न आहे. एक दिवस तुम्हीही माझ्याप्रमाणेच म्हणाल.'