मिरी 72
'मिरे, जगात माझ्यावर फारसे प्रेम कोणी केले नाही.'
आईबाप लहानपणीच गेले. मी चुलत्यांजवळ आहे. आपण निराधार असे मला वाटत असते. रमाकांतांचा आधार मिळेल असे वाटते.'
'प्रेमा, तू पोरकी आहेस. तुझ्याविषयी किती सहानुभूती मला वाटते. म्हणूनच सांगते की जरा जपून जा. तुझी निराशा न होवो. संपूर्णपणे पाऊल टाकल्यावर मग निराशा पदरी येणे फार वाईट. हृदयाला जरा खेचून धर.'
'बघू काय होते ते. लवकरच कृष्णचंद्रही आता येतील. होय ना ?'
'असे पत्र आले आहे खरे.'
'मिरे, मी आता पडते जाऊन.'
'मीही जाते.'
दुसर्या दिवशी वसंतोत्सवास जायला सगळयाजणी तयार होऊ लागल्या. मिरी जाणार नव्हतीच. लडी, मडी जणू राजकन्येप्रमाणे सजल्या. प्रेमाजवळ नटायला फारसे नव्हते. ती जरा दु:खी होती. इतक्यात मिरी तिच्याजवळ येऊन म्हणाली,
'प्रेमा, दु:खी का ?'
'मिरे, मला कोणते पातळ शोभेल सांग.'
'प्रेमा, माझ्याजवळ एक सुंदर पातळ आहे. ते तू नेस. तुला ते खुलून दिसेल. कानांत कर्णभूषणे घाल आणि तुझ्या केसांत मी सुंदर फुले गुंफते. तू जणू वनराणी शोभशील. काळीसावळी सुंदर हिंदकन्या!'
मिरीने प्रेमाला सजवले. प्रेमा आज खरेच सुंदर दिसत होती. ती त्या वेषात खाली गेली. लडी नि मडी चकित झाल्या.
'मिरी कलावान आहे.' मडी म्हणाली.
'परंतु स्वत: नटत नाही.' लडी म्हणाली.
'आफ्रिका परत येईल तेंव्हा ती नटेल.' राणीसरकार म्हणाल्या.
राणीसरकार नि त्या तिघीजणी वसंतोत्सवात गेल्या. मिरी वाचत बसली होती. नंतर बागेत जाऊन ती झाडांना पाणी घालू लागली. सायंकाळ होत आली. तिच्या जिवाला आज कसली तरी रुखरुख लागली होती. ती खोलीत येऊन बसली. पुन्हा उठली नि वरती गच्चीत गेली. तेथे ती आरामखुर्चीत पडून राहिली.
तो एकाएकी कुणीतरी आले. ती चमकली. कोण आले होते ? ते रमाकांत होते.
'मिरा !' त्याने प्रेमविव्हळ हाक मारली.
'तुम्ही वसंतोत्सवास जाणार होतेत ना ? प्रेमा आज किती सुंदर दिसत होती. तिचे पातळ, ती कर्णभूषणे, सारे तिच्या सावळया अंग कांतीला खुलून दिसत होते.'
'मी तिकडे जाऊन आलो.'
'प्रेमा अद्याप परत आली नाही. तुम्ही का आलेत ?'
'तेथे मिरी नव्हती म्हणून.'