Get it on Google Play
Download on the App Store

मिरी 54

'डॉक्टर, आजोबांची शेवटी घटका असावी. मुरारीला काय वाटेल ?'

'आपल्या स्वाधीनच्या का या गोष्टी आहेत ?'

गाडी दाराशी आली. डॉक्टर आत गेले. त्यांनी उभ्या उभ्याच पाहिले.

'मुरारीच्या आई, आजोबा देवाघरी गेले; किती सुंदर, शांत मरण ! तुम्ही दु:ख नका करू. त्यांचे वय झालेच होते. पिकले पान झाले होते ते.'

'मुरारी येईपर्यंत जगते तर बरे नसते का झाले ? मिरी-मुरारीच्या डोक्यांवर अक्षता टाकून ते आनंदाने गेले असते. ते म्हणतच असत की, मी तिकीट काढून ठेवले आहे. मुरारीला बघेन की निघेन.'

'नेमानेमाच्या गोष्टी. येथे मानवी अक्कल गुंग होते.'

'आणि डॉक्टर, मी आज मुद्दाम येताना हा गुच्छ आणला, तो जणू शेवटचा ठरला. शेवटची पूजा.'

'आज या पिंजर्‍यातल्या राजानेही काही खाल्ले नाही.'

डॉक्टरांनी आजोबांची सारी व्यवस्था केली. घर सुनेसुने झाले. दोन दिवस मिरी शाळेत गेली नाही आणि यशोदाआईंनीही अंथरूण धरले. मुलाची नि आपली भेट व्हावयाची नाही असाच त्यांनी ध्यास घेतला. मिरीला वाईट वाटे. ती रडे. तिने रजा घेतली. मुरारीच्या आईची ती सेवा करीत होती. एके दिवशी ती बाजारात गेली होती. तो त्याच वेळेस घरी डॉक्टर आले होते.

'काय आई कसे आहे ?' ते म्हणाले.

'डॉक्टर, माझे वडील गेले. मीही जाणार. मुरारी काही भेटत नाही. डॉक्टर, मी सांगते तसे तुम्ही मुरारीस पत्र लिहा.'

'मिरी लिहिल.'

'तुम्ही लिहून ते मिरीजवळ द्या.'

डॉक्टरांना मरणोन्मुखाची इच्छा मोडवेना. त्यांनी कागद घेतला. 'सांगा, काय लिहू ते.' ते म्हणाले.

ती माता सांगू लागली;

'बाळ मुरारीस आशीर्वाद.'

तुझे आजोबा गेले. मीही चालले. तुझ्या भेटीकडे डोळे होते. परंतु देवाची इच्छा. काय करायचे ? तू उदंड आयुष्याचा हो. मुरारी, तू माझी, तुझ्या आजोबांची नि माझी सेवा केली त्या मिरीला कधी अंतर देऊ नकोस. ती तुझ्या आजोबांना तुझ्या नावाचे घास देऊन भरवी. त्यांना थोपटून झोपवी. त्यांना शोधून घरी घेऊन येई. तिचेच फक्त ते ऐकत. जणू तुझा नि तिचा एकजीव झालेला त्यांना दिसे. ते तुझी सारखी आठवण करीत. पण गेले ते. आता मीही शेवटचे क्षण मोजीत आहे. मिरीने आम्हाला दोघांचे सारे केले. सुमित्राताईंकडचे सुखाचे जीवन सोडून ती येथे येऊन राहिली. येथे नोकरी करी. मिळवी ते सारे तुझ्या आईसाठी, आजोबांसाठी खर्च करी आणि तुझ्या पाखराला किती जपते ! मुरारी बाळ, अशी देवता कुठे मिळणार नाही हो ! तुम्ही दोघे एकमेकांची व्हा. मिरीला सुखी कर. तुमचा संसार सुखाचा होवो. त्या सुखाच्या संसारात आम्हांला अधूनमधून आठवा, कृपारामकाकांना आठवा, देवाला विसरू नका. जवळ असेल ते सर्वांना द्या. अभिमान नको. आईचे तुला, मिरीला शेवटचे आशीर्वाद. उदंड आशीर्वाद.

देवाघरी जाणारी तुझी
आई’

मिरी

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
मिरी 1 मिरी 2 मिरी 3 मिरी 4 मिरी 5 मिरी 6 मिरी 7 मिरी 8 मिरी 9 मिरी 10 मिरी 11 मिरी 12 मिरी 13 मिरी 14 मिरी 15 मिरी 16 मिरी 17 मिरी 18 मिरी 19 मिरी 20 मिरी 21 मिरी 22 मिरी 23 मिरी 24 मिरी 25 मिरी 26 मिरी 27 मिरी 28 मिरी 29 मिरी 30 मिरी 31 मिरी 32 मिरी 33 मिरी 34 मिरी 35 मिरी 36 मिरी 37 मिरी 38 मिरी 39 मिरी 40 मिरी 41 मिरी 42 मिरी 43 मिरी 44 मिरी 45 मिरी 46 मिरी 47 मिरी 48 मिरी 49 मिरी 50 मिरी 51 मिरी 52 मिरी 53 मिरी 54 मिरी 55 मिरी 56 मिरी 57 मिरी 58 मिरी 59 मिरी 60 मिरी 61 मिरी 62 मिरी 63 मिरी 64 मिरी 65 मिरी 66 मिरी 67 मिरी 68 मिरी 69 मिरी 70 मिरी 71 मिरी 72 मिरी 73 मिरी 74 मिरी 75 मिरी 76 मिरी 77 मिरी 78 मिरी 79 मिरी 80 मिरी 81 मिरी 82 मिरी 83 मिरी 84 मिरी 85 मिरी 86 मिरी 87 मिरी 88 मिरी 89 मिरी 90 मिरी 91 मिरी 92 मिरी 93 मिरी 94 मिरी 95 मिरी 96 मिरी 97 मिरी 98 मिरी 99 मिरी 100 मिरी 101