मिरी 47
मिरी यशोदाआईंकडे राहायला आली. ती शाळेत शिकवी. घरी आजोबांना सांभाळी. तो म्हातारा काय असेल ते असो, फक्त मिरीचेच ऐके. परंतु एके दिवशी ती जुनी जागा यशोदाआईंना सोडावी लागली. त्या आता दुसरीकडे राहायला आल्या. अगदीच एका बाजूला ती नवी जागा होती. जवळपास शेजार कोणाचा नव्हता. त्यांना त्या पूर्वीच्या जागेच्या हजारो आठवणी येत. तेथील आसपासची मंडळी आठवत. यशोदाआई कष्टी दिसत आणि त्यांचे ते ऐंशी वर्षांचे वृध्द वडील ? त्यांचा भ्रमिष्टपणा वाढतच चालला.
एके दिवशी मिरी शाळेतून सायंकाळी घरी आली. तो यशोदाआई रडत होत्या.
'काय झाले मुरारीच्या आई ?'
'त्यांचा कोठेच पत्ता नाही. मी धुंडून दमले.'
'मी त्यांना शोधून आणते.'
मिरी लगेच निघाली. तो एके ठिकाणी तिला ते डॉक्टर भेटले.
'काय मिराबेन, इकडे कोठे ?'
'हल्ली मी येथेच आहे. यशोदाआईकडे राहाते.'
'का बरे ?'
'त्यांचे वडील भ्रमिष्ट झाले आहेत नि यशोदाआईंनाही बरे नसते म्हणून आले.'
'आता तिन्हीसांजा धांदलीत कोठे चाललीस तू ?'
'मुरारीचे आजोबा कोठे तरी गेले आहेत. त्यांना शोधायला जाते.'
'मी पण तुझ्याबरोबर येतो. परंतु येथे जरा त्या गल्लीत एक रोगी आहे. शेवटची घटका मोजीतच आहेत. बघतो नि येतो. ये माझ्या बरोबर. आपण लगेच जाऊ.'
मिरी डॉक्टरांबरोबर या अरुंद गल्लीत गेली. मग घाणेरडा बोळ लागला. अत्यंत गलिच्छ वस्ती तेथे होती आणि एका घराच्या बोळातून दोघे चालली. एक अंधारा जिना लागला. कशी तरी खोली होती. त्या खोलीत कोणीतरी खोकत होते. एक म्हातारी बाई फाटक्या घोंगडीवर पडलेली होती. एक तरुण बाई लहान मुलाला पाजीत होती. डॉक्टर आत शिरले. मिरी बाहेर उभी राहिली.
'मिरे, आत ये.' डॉक्टर म्हणाले.
मिरी आत येऊन बसली. तिने रोग्याकडे पाहिले. ती एकदम दचकून म्हणाली, 'ही तर माझी आत्या !'
आत्याने वर पाहिले.
'कोण तू ?'
'मी मिरी.'
'होय, आत्या.'