मिरी 18
मुरारीचे आजोबा त्या मंदिरात चित्र काढण्यासाठी जात होते.
'नाना, थांबा. मिरी येईल बरोबर.'
'ती नको माझ्याबरोबर यायला. मी एकटा जाईन.'
'येऊ दे बरोबर. तुम्हांला पोचवील नि परत येईल. ऐका माझे.'
मिरी आली. परकर-पोलके तिला छान दिसत होते. तिने नानांचा हात धरला.
'हात नको धरायला. मी पडणार नाही.'
'पण धरू दे ना हात !'
तिने धरलाच त्यांचा हात. ते मंदिरात आले. ते दोघेही आत गेले. नाना बसले जाऊन. तेथे कुंचले होते. रंग होते. ते लागले काम करायला.
'मी जाऊ, नाना ?'
'जा. घरीच जा.'
मिरी निघाली. परंतु तिने आधी सारे मंदिर पाहिले. तो एका ठिकाणी तिला कोण दिसले ? ती थबकून उभी राहिली. कोण होते तेथे ? डोळे मिटून कोणी तरी तेथे बसले होते. मिरी जवळ गेली.
'कोण आहे ?' त्या व्यक्तीने विचारले.
'मी मिरी. तुम्ही अशा का बसल्यात ?'
'येथे मंदिरात एक गवई येणार होते. म्हणून मला बाबांनी येथे आणून बसविले. बाबा कोठे तरी गेले. तो गवईही नाही आला. म्हणून येथे बसले आहे.'
'तुम्हांला दिसत नाही ?'
'बाहेरचे नाही दिसत.'
'मग कोठले दिसते ?'
'मनातले सारे दिसते.'
'मनात काय असणार ? बाहेर खरी मजा. तुम्हांला काही नाही दिसत ? झाडे, फुले, पाखरे, दिवे, आकाशातील तारे, काही दिसत नाही ? माझे तोंड, माझे डोळे नाही दिसत ?'
'नाही. काही नाही दिसत.'
'माझे डोळे नाही पाहिलेत ते बरेच झाले.'
'का बाळ असे बोलतेस ? मला पाहता येत नाही ते का बरे ? दुसर्याला डोळे नसणे ते का बरे?'