मिरी 6
'तुम्ही करा. मी तुमची होईन. कुठे जाऊ मी ? कोण आहे मला ? आई नाही. बाप नाही, भाऊ नाही. तुम्ही माझे व्हा. मी रोज तुमच्याकडे बघत असे. तुम्ही लोकांसाठी दिवे लावता. किती छान तुम्ही ? नेता ना मला ?
'मिरे, काय सांगू ? खरेच का माझ्याकडे येणार ?'
'हो, खरेच.'
'मी गरीब आहे, मिरे.'
'मी काम करीन. तुम्ही सांगाल ते करीन.'
'चल तर माझ्याबरोबर. देव मार्ग दाखवील.'
तो तिला घेऊन घरी आला. ती गरीब लोकांची वस्ती होती. तेथे कृपारामाची लहानशी खोली होती. खाली शिडी अडकवून ती दोघे खोलीत आली. त्याने दिवा लावला.
'बस मिरे. तू जेवशील ना थोडे ?'
'मला भूक नाही. मला निजू दे.'
'थोडे दूध तरी घे. तशी नको निजूस. मी तापवतो.' त्याने कागद पेटवून त्यावर दूध तापवले. त्याने मिरीला दिले. तेथे एक खाट होती. त्याने तिच्यावरचे अंथरुण साफसूफ केले.
'मिरे, नीज त्या अंथरुणावर.'
'आणि तुम्ही ?'
'मी या आरामखुर्चीवर निजेन.'
'तुम्ही माझ्याजवळ नाही निजणार ? मला कुशीत घेऊन निजा. रात्री मला भीती वाटेल. आजचा दिवस तरी तुम्ही माझ्याजवळ झोपा. मी लोळत नाही. मला थोपटा.'
त्याने मिरीला निजविले. तिच्या केसांवरुन त्याने हात फिरविला. तिचे तोंड त्याने कुरवाळले. तिला प्रेमाने तो थोपटीत बसला.
'नीज हो मिरे. भिऊ नकोस. मी आहे जवळ.'
मिरीने डोळे मिटले. परंतु डोळे उघडून तिने पुन्हा पाहिले, कृपाराम जवळ होते.