मिरी 70
'प्रेमाचे आज पोट भरले असेल.' लडी म्हणाली.
'कोठे फराळाला का गेली होती ? काय ग प्रेमा ? आम्हांला नाही बोलावलेस ते ? एकटीएकटी गेलीस ना ?' मडी बोलली.
'तुम्हांला आमंत्रण मिळाले होते. तुमची कपाळे दुखत होती. अजीर्ण झाले असेल किंवा जिभेला रुची नसेल. मी भुकेली होते. तोंडाला चव होती. मी गेले.'
'पोटभर फराळ केलास ना ?'
'मी नेहमी प्रमाणात खाते, प्रमाणात वागते.'
'प्रमाणातच सौंदर्य असते.'
'बाकी रमाकांत रसिक आहेत. खेळाडू वृत्तीचे आहेत आणि हसतात केवढयाने.'
'प्रेमा, त्यांच्या हसण्याने घाबरत नाहीस ना ?'
'मोकळया वृत्तीचे ते हास्य असते.'
'मला तर वाटते ते खोटे असते.'
'जेवा ग पोरींनो. बोलाल किती !' राणीसरकार म्हणाल्या.
'आक्का, जेवल्यावर फोनो लावू का ?' मडीने विचारले.
'लाव.'
'परंतु प्रेमाला आवडेल तेच गाणे लावायचे.'
'आज तिच्या हृदयात फोनो सुरू आहे. गाण्यावर गाणी तेथे चालली असतील. गोड गोड गाणी, मधुर भावगीते.'
प्रेमा पटकन् उठून गेली.
'मिरी, तुझेही पोट भरले आहे की काय ?'
'भरत आले आहे.' ती म्हणाली.
जेवणे झाली. मिरीने सुमित्राताईंस दूध नेऊन दिले. खाली थोडे काम करून ती वरती खोलीत आली. सुमित्राताईंस एक सुंदरसे पुस्तक वाचून दाखवायला ती बसली. तिकडे दिवाणखान्यात फोनो लागला होता. हसणे-खिदळणे चालले होते. अनेक गाणी लागली. शेवटी...
“अब तेरे सिवा कौन मुझे कृष्ण-कन्हैय्या
भगवान किनारे लगा दे मोरी नैय्या.”
हे मिराबाईचे सुंदर गाणे लागले. मिरीला ते गाणे फार आवडत असे. पुस्तक मिटून ती ते गाणे डोळे मिटून ऐकत होती. सुमित्राताईंनी ते ओळखले. त्याही भक्तिभावाने ऐकत होत्या. प्रेमाही आपल्या अंथरुणात पडून ऐकत होती.
'मिरे, मी आता झोपते.' सुमित्राताई म्हणाल्या.
'पडा तुम्ही.' मिरी म्हणाली.
मिरी वर गेली. आकाशातील तारे पाहात होती. मुरारी नि ती लहानपणी तारे बघत असत आणि ती खिडकीतून एका तेजस्वी तार्याकडे लहानपणी बघत असे. कृपाकाकांचा तारा का तेथे असेल ? कोठे जातात हे आत्मे ? या आत्मज्योती का कायमच्या मावळल्या जातात ? तिच्या मनात अनेक कल्पना येत होत्या; तिला अनेक स्मृती आल्या आणि मुरारी आठवला. मुरारीला आई ना बाप, बहीण ना भाऊ; मीही तशीच. दोघे आम्ही पोरकी. मुरारी लांब आहे. किती दूर. शेकडो, हजारो मैल दूर ! तिने खाली जाऊन राजाचा पिंजरा आणला. हळूच आणला. राजा झोपला होता. तिने तो पिंजरा हळूच खाली ठेवला. त्याची झोपमोड तिने केली नाही. जणू त्याची झोपमोड म्हणजे तिकडे मुरारीची झोपमोड असे तिला वाटले.