मिरी 1
सायंकाळची वेळ होती. सहा वाजले असतील. लवकरच घरीदारी दिवे लागतील. वरती आकाशात दिवे लागतील. ती पहा एक लहान मुलगी रस्त्याच्या कडेला उभी आहे. तिच्या हातात भांडे आहे. कोठे जायचे आहे तिला ? तेथे ती का उभी आहे ? कोणाची वाट पहात आहे ? इतक्यात पाठीमागून कोणी तरी आले. तिच्या पाठीत रपाटा बसला.
'कार्टी येथे उभी आहे अजून ! दूध नाही का आणायचे ? जा लवकर. लोक जेवायला येतील. पाट-पाणी अजून करायचे आहे. आळशी आहे सार्या मुलखाची. नीघ.'
मिरी डोळे पुशीत गेली. दूध घेऊन ती परत येत होती. कोणाला तरी बघत बघत ती येत होती. इतक्यात कोणाचा तरी तिला धक्का लागला. सारे दूध सांडले. ती रडू लागली.
'काय झाले बाळ ? माझ्या शिडीचा धक्का लागला ? उगी. रडू नकोस सांडले दूध तर सांडले. सांग घरात की माझा धक्का लागला. तुला कोणी रागे भरणार नाही.'
'आत्याबाई मारील. मघाशीच तिने धपाटा मारला. मघाशी येथे तुमची वाट बघत उभी होते. तुम्हांला पाहून मगच मी दूध आणायला जाणार होते; परंतु धपाटा मिळाल्यामुळे मी आधी गेले आणि मी तुम्हालाच बघत बघत येत होते. तो तुमची शिडी मला लागली.'
'तू माझ्यासाठी थांबली होतीस ?'
'हो. तुम्ही रोज येता. हा येथला दिवा तुम्ही लावता. माझ्या खिडकीतून हा दिवा दिसतो. सुंदर दिवा! तुम्ही हे सारे दिवे लावता. होय ना ? तुमची ही शिडी, तुमच्या हातातला हा कंदील; तुम्ही मला आवडता. या कंदिलाने तुम्ही सारे दिवे लावता. होय ना ? आकाशात कोण हो दिवे लावते ? हातात कंदील घेऊन कोण तेथे काम करते ? तेथेसुध्दा खांद्यावर शिडी घेऊन जाणारे कोणी असेल ?'
'बाळ, तेथेही कोणीतरी काम करणारे असेल. आणि मी तुला आवडतो ? खरेच की काय ?'
'होय. केव्हा एकदा संध्याकाळ होते नि तुमचा कंदील दिसतो असे मला होते. मी तुमची वाट पाहत असते. कधी कधी त्या खिडकीतून मी तुम्हांला बघते. तुम्ही या दिव्याच्या खांबावर शिडीवरून चढता, दिवा लावता नि जाता. होय ना ?'
'तू आता घरी जा.'
'कशी जाऊ घरात ? आत्याबाई मारील.'
इतक्यात आत्याबाई तेथे आली.