मिरी 57
परंतु मिरीचे वास्तव्य तेथे फार दिवस व्हायचे नव्हते. सुमित्राताई पुन्हा आजारी पडल्याचे पत्र आले. त्यात त्यांनी लिहिले होते 'तुझे तिकडचे कर्तव्य संपले. आता माझ्याजवळ ये. मला बरे वाटत नाही.' ते पत्र हातात घेऊन मिरी बसली होती तो तिला भेटायला डॉक्टर आले.
'मिरे, गंभीरशी?'
'सुमित्राताई आजारी आहेत.'
'हो, मी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या त्या खेडयात जाऊन आलो. कृष्णचंद्र मला म्हणाले, 'मिरीला पाठवा.' मी त्यांना सांगितले की, 'ती येणार नाही. तुम्ही तिला वाकबाण मारले आहेत. ती आपले स्वतंत्र, स्वावलंबी जीवन सोडून तुमच्याकडे परत कशी येईल ?' आणि मिरे, त्यांनी बोलावले तरी तू जाऊ नकोस, करारीपणा माणसात थोडा तरी हवाच.'
'डॉक्टर, मला जायला हवे. सुमित्राताईंचे पत्र आले आहे. पत्रावरुन त्या सुखी नाहीत असे दिसते. आता जाणे हेच कर्तव्य.'
'तुला का स्वाभिमान नाही ? जाऊ नकोस. कृष्णचंद्र आहेत तो तेथे पाऊल ठेवू नकोस. वाटेल ते तुला बोलले.'
'डॉक्टर, परंतु सुमित्राताईंकडे पाहायला नको का ? सुमित्राताई म्हणजे माझे दैवत त्यांनी मला जीवनाचा खरा अर्थ शिकवला. त्यांच्यासाठी सारा अभिमान मी गुंडाळून ठेवला पाहिजे.'
'तू हे स्वतंत्र जीवन सोडून जाणार ? या सुरेख नोकरीचा त्याग करणार ? कशासाठी हा सारा त्याग करायचा ?'
'डॉक्टर, सुमित्राताईंसाठी जे काही करीन त्याला त्याग हा शब्द लावू नका. त्यांच्यासाठी सर्व काही करण्यात माझा परम आनंद आहे. त्यात मला कष्ट नाहीत, डॉक्टर.'
'होय मिरे, सत्कर्म करणे हाच खरा आनंद. थोर आहेस तू. स्वाभिमानी असूनही तू निरहंकारी आहेस. जा बेटा. सुमित्राताईंकडे जा. त्यांच्या जीवनात आनंद आण. त्यांना बरे वाटले की युरोपच्या यात्रेला कृष्णचंद्र जाऊ म्हणत आहेत. तूही जाशीलच. विशाल जग पाहून ये. पाश्चिमात्य संस्कृती पाहून ये. स्वच्छता, नीटनेटकेपणा, नियमितपणा, संशोधक वृत्ती, सार्वजनिक सेवेची आवड, स्वातंत्र्यप्रेम, किती तरी गोष्टी त्यांच्यापासून आपण घेतल्या पाहिजेत. विज्ञानाचा डोळा त्यांच्यापासून आपण घ्यायला हवा.'
'आणि सर्व अद्वैत पाहण्याचा ज्ञानाचा दुसरा डोळा आपण त्यांना द्यायला हवा.'
'मिरे, अद्वैताचा डोळा तरी आपणांजवळ कुठे आहे ? आपल्याकडे तर भेदांचा बुजबुजाट आहे. आपल्याजवळ ना ज्ञानाचा डोळा, ना विज्ञानाचा. आपण दोन्ही डोळयांनी आंधळे आहोत. म्हणून तर आपला राष्ट्रीय संसार सारा भिकार झाला आहे. निस्तेज, निरानंद झाला आहे,'
'डॉक्टर, मी उद्याच जाईन म्हणते.'
'तुला एकदम नोकरी सोडता येईल का ?'
'मी त्यांना सारे समजावून सांगेन. नाही तर रजा घेऊन जाईन. मागून राजीनामा पाठवीन.
'जा बेटी. पुन्हा या शहरात राहायला कधी येणार ?'
'युरोपातून आलो म्हणजे.'
डॉक्टर गेले. मिरी जाणार ही बातमी सर्व वसतिगृहात क्षणात पसरली. मुलींना वाईट वाटले. मिरीने त्यांची समजूत घातली. दुपारी तिने चालकांना सारी परिस्थिती निवेदली. तिला रजा देण्यात आली. मागून वाटले तर राजीनामा पाठवावा असे सांगण्यात आले.